मुंबई : शिवसेनेने भाजपसोबत युती तोडल्याचं जाहीर केल्यानंतर भाजप सेनेला घेरण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांची 'काळी पत्रिका' जाहीर करण्याची घोषणा भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.


मुंबई महापालिकेतील दहा घोटाळ्यांची 'काळी पत्रिका' बाहेर काढणार असल्याचा दावा सोमय्या यांनी मुंबईतील विक्रोळीमध्ये झालेल्या भाजपच्या सभेत केला. महापालिकेतील घोटाळ्यांची मालिका थांबता थांबत नसल्यामुळे आपण ही पोलखोल करणार असल्याचं सोमय्या म्हणाले.

पाणी, रस्ते, नालेसफाई अशा विविध दहा घोटाळ्यांचा समावेश या ब्लॅक पेपरमध्ये असल्याचं सोमय्या म्हणाले. अपात्र कंत्राटदारांना पात्र ठरवून कामं दिली जातात. टेंडरवरील किमतीच्या तिप्पट रक्कम दिली जाते, असं दावा सोमय्यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या प्रतिक्रियेत केला.

मुंबई महापालिकेत पारदर्शी कारभारासाठी आपण आग्रही असल्यामुळे ही घोटाळ्यांची काळी पत्रिका बाहेर काढणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलं. त्याशिवाय भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'माझी मुंबई' हे भाजपचं घोषणापत्र जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले.

'राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका यापुढे स्बळावर लढणार' अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. प्रजासत्ताक दिनी गोरेगावच्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. मुंबईसह 10 महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगणार आहे.

'गेली 25 वर्ष शिवसेना युतीत सडली. पण आता ही फरफट होणार नाही. तुम्ही मला वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतो आहे की, आता यापुढे शिवसेना महाराष्ट्रात भगवा फडकवेल. कोणाच्याही समोर युतीसाठी कटोरं घेऊन जाणार नाही. महाराष्ट्रात कुठेही यापुढे मी युती करणार नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपशी काडीमोड घेतल्याचं जाहीर केलं.

संबंधित बातम्या :


शिवसेना-भाजपची युती तुटली, महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार