मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आजवर अनेक विरोधी पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लक्ष घालत गंभीर आरोप केले आहेत. आता तर त्यांनी अकरा जणांची यादीत ट्वीट केली आहे.  किरीट सोमय्यांच्या यादीतलं पहिलं नाव आहे प्रताप सरनाईक. NSEL मध्ये अडीचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत ईडी कडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या आणि मुंबईच्या अशा दोन्ही घरांवर छापेमारी करण्यात आली होती.


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. परमबीर सिंह यांनी देशमुखांवर 100 कोटींच्या वसूलीचा आरोप केला. आणि तेव्हापासून अनिल देखमुख ईडीसह भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आले. ईडीनं अनिल देशमुखांना चौकशीसाठी समन्सही बजावला, मात्र देशमुख ईडीसमोर आले नाही.






राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते अनिल परब यांचं नाव तिसऱ्या स्थानावर आहे. काल अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आणि किरीट सोमय्यांनी परबांवरच्या आरोपांची यादी वाचून दाखवली. सचिन वाझे प्रकरण असो, आरटीओमधला गैरव्यहार आणि दापोलीमध्ये बांधलेलं रिसॉर्ट असा अनेक गोष्टींवरुन किरीट सोमय्या यांनी अनिर परब यांच्या निशाणा साधला.


शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या. त्याआधी भाजपनं भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या.


किरीट सोमय्यांच्या यादीत मंबईच्या महापौर किरोशी पेडणेकरांचं नाव पाचव्या स्थानावर आहे. पेडणेकर यांनी स्वत: झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील लाभार्थी नसतानाही एसआरए प्रकल्पाच्या इमारतीतील अनेक सदनिका बेकायदेशीररीत्या बाळगल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.


रवींद्र वायकर यांचंही नाव किरीट सोमय्यांच्या यादी आहे. अवैध्यरित्या अलिबागमध्ये बंगले खरेदी केल्याचा आरोप वायकर यांच्यावर आहे. अलिबागमध्ये ३० जमीनीचे करार करण्यात आले. आणि ही सर्व माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.


किरीट सोमय्यांनी ट्वीट केलेल्या नेत्यांच्या यादीत सातव्या स्थानावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच नाव आहे. त्यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांच्यावर एसआरएचा भूखंड प्रकरणी आरोप करण्यात आलाय. शिवाय, त्यांची लवकरच चौकशी होईल असाही दावा किरीट सोमय्यांनी केलाय.


मंत्री छगन भुजबळ यांचंही नाव किरीट सोमय्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये आहे. छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ यांची 100 कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला होता. मात्र, त्याला उत्तर देत संपत्तीशी आपला काहीही संबंध नसल्याचा छगन भुजबळ यांनी सांगितलंय.


किरीट सोमय्यांच्या यादीत मंत्र्यांबरोबरच मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याही नावाचा समावेश आहे. मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे . यशवंत जाधव कुटुंबाने हवालाच्या माध्यमातून युएई येथील दोन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे असा आरोप केला होता.


भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांच्या पत्नीवरही किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. शिवाय, निवडणूक प्रतिज्ञापत्रातील त्रुटीवरुन आयकर विभागानं यामिनी जाधव यांच्यावर कारवाईची तयारी केलीय. त्यामुळे त्यांची आमदारकीही धोक्यात आलीय.


किरीट सोमय्यांनी ट्वीट केलेल्या 11 नेत्यांच्या यादीत मिलिंद नार्वेकर यांचंही नाव आहे . शिवसेने सचिव आणि उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी कोणतीही परवानगी न घेता दापोलीमध्ये समुद्र किनारी बंगला बांधल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. इतकंच नाही तर किरीट सोमय्या यांनी रत्नागिरी जिल्ह्यात जात नार्वेकरांच्या बंगल्याची पाहणी केहीली. महाविकास आघाडी सरकार नार्वेकरांना पाठिशी घालत असल्याचा आरोपही सोमय्यांनी यावेळी केला होता.