मुंबई: उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ललकारले होते. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा भाषेत उद्धव यांनी फडणवीसांना आव्हान दिले होते. या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या भाजप नेत्यांची फौज उद्धव ठाकरे यांच्यावर अक्षरश: तुटून पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना तुम्हाला फडणवीसांचं राजकारण संपवायला 100 जन्म घ्यावे लागतील, असे म्हटले. 


आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याविरोधात षडयंत्र रचून त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जंगजंग पछाडलं. पण मायबाप जनतेच्या आशीर्वादानं उद्धव ठाकरे देवेंद्रजींना तुरुंगात टाकू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर तर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रताही नाही, त्यामुळे घाम फोडण्याची त्यांची भाषा हास्यास्पद आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला, तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न केला. आता त्यांना संपविण्याची अहंकारी भाषा करताहेत, पण त्यांनी लक्षात ठेवावं, तुमचा हाच अहंकार जनता जनार्दन संपविल्याशिवाय राहणार नाही.  देवेंद्रजींच्या पाठीशी जनता आहे, परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. त्यांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील, असे बावनकुळे यांनी म्हटले. 


उद्धवजी खरं बोललात, माननीय फडणवीसजीच राहतील: चित्रा वाघ


माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाची कावीळ झालेले अनेक कावीळग्रस्त सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत आहेत, त्यातील एक उद्धटपंत तुम्ही आहात ! हिंदुत्व सोडून आणि वडिलांच्या विचारांशी प्रतारणा करून तुम्ही दोन्ही काँग्रेसच्या मांडीवर बसून सत्ता उबवली. पण, उसने कर्तृत्व फार काळ टिकले नाही. सत्तेवर असताना  घरी बसलात, सत्ता गेल्यावर तर कायमचे घरी बसणे नशिबी आले. 


ऊठसूठ मा. देवेंद्रजींवर गरळ ओकण्यासाठी एकाला तुम्ही कायमचे पाळलेले आहेच. त्याने पक्षाचे वाटोळे केले, तरी तुमचे डोळे उघडत नाहीत, हे दुर्दैव! त्याच्या पावलावर पाऊल टाकत तुमची 'विनाशकाले विपरीत बुद्धी' झाली आहे! उद्धटपंत, भ्रामक कल्पनेत वावरू नका, वास्तवाला सामोरे जा. तुम्ही म्हणता ते एकदम मान्य.. महाराष्ट्रातील जनताच म्हणू लागली आहे, आम्हाला मा. देवेंद्रजी पाहिजेत, बाकी सब झूठ हैं ! 


 काँग्रेसच्या मांडीवर बसता,
 राखण्यासाठी 'हिरवी' मर्जी !
 मराठ्यांच्या महाराष्ट्रातच,
 उद्धटपंतांना हिंदूंची एलर्जी!


महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरेंची लाज वाटतेय: केशव उपाध्ये


महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठाकरे आज तुमची लाज वाटते. महाराष्ट्रात समृद्ध परंपरा आहे बाळासाहेब ठाकरे असतील शरद पवार आहेत बाकी अन्य नेते आहेत. गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन अशी मोठी परंपरा आहे. हे एकमेकांचे विरोधक होते मतभेद होते मात्र कोणीही कोणत्या नेत्यांनी एकमेकांना संपवण्याची भाषा केली नाही. 


महाराष्ट्राच्या दुर्दैवाने तुम्ही मुख्यमंत्री होतात असा मुख्यमंत्री जो कधी मंत्रालयात गेला नाही ज्याने जनहिताचे काम केले नाहीत.तो काळही आम्ही बघितला. तुमच्या पासून कार्यकर्ते आमदार जनता गेली. मात्र, त्याचा दोष तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना देताय. मुख्यमंत्री असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला मात्र ते झालं नाही कारण सत्य हे सत्य असते. ही भाषा एका माजी मुख्यमंत्र्याला शोभणारी नाही. तुम्हाला लोकांनी कधी स्वीकारलं नाही,तरीही तुम्ही मुख्यमंत्री झालात. येत्या काळात जनता ठरवणार आहे कोणाला त्या पदावर बसवायचं.तुमच्या या सूडबुद्धीच्या विधानाने जनतेला मात्र लाज वाटते, असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले.


VIDEO: उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना ललकारलं



आणखी वाचा


एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा