नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. आता भाजप नेते गणेश नाईक यांनीही आव्हाडांना उत्तर दिलं आहे. "तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज, और बाप ने नाम पूछा तो बोल गणेश नाईक", असं उत्तर नाईक यांनी दिलं आहे.


येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोपरखैरणेत पार पडलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर जोरदार हल्लाबोल केला. "गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यांनी मुलाला भाजपमध्ये पाठवून त्याचा बळी दिला," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.


गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप


यानंतर गणेश नाईक यांनीही जितेंद्र आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. आव्हाडांना प्रत्युत्तर देताना गणेश नाईक यांनी सिनेमाचे डॉयलॉग वापरले. ते म्हणाले की, "गणेश नाईकांचं नाव घेतलं तर आपलं भाषण ऐकतील असं काहींना वाटतं. ते भाषण ऐकण्यासाठी गणेश नाईकांचं नाव घेत आहेत. मी जो डायलॉग बोललो ती बाब खरी आहे. तेरे बस की बात नहीं है, तेरे बाप को भेज, और बाप ने नाम पूछा तो बोल गणेश नाईक". तसंच माझ्यावर पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची केस दाखल नसून खंडणी मागितली नसल्याचं नाईक यांनी सांगितलं.


जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणेतील सभेत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते की, "गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत. नवी मुंबईतील कारखाने, दगड खाणींकडून ते खंडणी वसूल करत आहेत. भाजपने गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक यांना नवी मुंबईतून उमेदवारी दिली होती. मात्र वडील गणेश नाईक यांनी राजकीय महत्वाकांक्षेसाठी मुलाच्या राजकीय कारकिर्दीचा बळी घेतला. असा व्यक्ती कार्यकर्त्यांना कसा न्याय देणार?