Dadar Market:मुंबईतील दादर मार्केट परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करताना भाजपच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकर (Akshata Tendulkar) यांनी रुग्णवाहिकेचा (Ambulance) बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप केला जात आहे. रुग्ण नसताना आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसताना गर्दीच्या दादर मार्केटमध्ये सायरन सुरू ठेवून रुग्णवाहिका फिरवण्यात आली, असा दावा करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये रुग्णवाहिकेत स्वतः अक्षता तेंडुलकर आणि काही कार्यकर्ते उपस्थित असल्याचे दिसत आहे.
Dadar Market:: नेमकं काय घडलं?
फेरीवाल्यांच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केल्यानंतर, गर्दीने भरलेल्या दादर मार्केट परिसरात सायरन वाजवत रुग्णवाहिका फिरवण्यात आली. मात्र, या रुग्णवाहिकेत कोणताही रुग्ण नव्हता आणि आपत्कालीन सेवा देण्याची गरजही नव्हती, असा आरोप आहे. रुग्णवाहिकेत स्वतः अक्षता तेंडुलकर आणि त्यांचे काही कार्यकर्ते दिसून येत आहेत. त्यामुळे भाजप पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांच्याकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर करण्यात आला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Traffic Rules: कायदा काय सांगतो?
वाहतूक नियमांनुसार, रुग्णवाहिकेत रुग्ण नसताना किंवा इमर्जन्सी नसताना सायरन वापरणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचा वापर केल्यास वाहतूक नियमांचे उल्लंघन ठरते आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते.
Police: प्रकरणाची वाहतूक पोलिसांकडून दखल
या प्रकरणाची दखल वाहतूक पोलिसांनी घेतली असून, उपलब्ध व्हिडिओ आणि पुराव्यांच्या आधारे कारवाईची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. आपत्कालीन सेवांचा असा वापर केल्यास सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो, अशी टीका होत आहे. आता या प्रकरणात अक्षता तेंडूलकर यांच्यावर काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
