मुंबई: मला मंत्रिपद देण्याबाबत विलंब का होतोय, याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना विचारा. मला त्याबाबत माहिती नाही. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी दिल्लीत चर्चा झाली. मला भाजपकडून राज्यसभेची ऑफर आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली. ते एबीपी माझाशी बोलत होते.


नारायण राणे यांनी बुधवारी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्या 11 अकबर रोड या दिल्लीतल्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांच्यात जवळपास तासभर बैठक झाली. या बैठकीला नितेश राणे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती.

या बैठकीचा तपशील नारायण राणे यांनी एबीपी माझाला सांगितला.

राणे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश करण्याबाबतचा शब्द दिला आहे. मात्र यासाठी विलंब का होत आहे, याची मला कल्पना नाही. त्याबाबत मुख्यमंत्रीच सांगू शकतील. काही गोष्टींबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे थांबू शकत नसाल तर राज्यसभेवर पाठवू, अशी ऑफर भाजपने दिली आहे. मात्र महाराष्ट्रात मंत्री की राज्यसभा याबाबतचा निर्णय विचार करुन कळवू, असं मी त्यांना सांगितलं आहे”

याशिवाय मंत्रिपदाच्या आड शिवसेनेचा विरोध हे कारण आहे असं वाटतं का, असा प्रश्न विचारला असता, राणे म्हणाले, त्याबाबतचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत, त्यामुळे शिवसेनेच्या पोकळ धमकीला मुख्यमंत्री घाबरणार नाहीत.

VIDEO