महालक्ष्मी येथील मोडकळीस आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या दोन इमारती पाडून महापालिका अधिकाऱ्यांसाठी जिमखाना उभारण्यात येणार आहे. त्याऐवजी तिथे महापौर बंगला उभारावा, असं भाजपचं म्हणणं आहे.
अधिकाऱ्यांसाठी जिमखाना जरुरी नसून महापौरांना पर्यायी बंगला मिळणं आवश्यक आहे. याचा विचार करुन या भूखंडावर महापौर बंगला उभारावा, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी स्थायी समितीत केली. मात्र सत्ताधारी शिवसेनेने भाजपच्या विरोधानंतरही जिमखान्याचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे भाजपाने सभात्याग केला.
महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या हद्दीत येणाऱ्या महालक्ष्मी येथील केशव खाडे मार्गावर नगर भूमापन क्रमांक 47/6 वर पालिकेच्या दोन इमारती आहेत. या इमारती मोडकळीस आल्या असून त्या पाडून भूखंडावर अधिकाऱ्यांसाठी जिमखाना उभारला जाणार आहे.
या साठी लँडमार्क कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या कामांसाठी कंत्राटदाराला 48 कोटी 75 लाख 24 हजार 784 रुपये इतकी रक्कम अदा केली जाणार आहे. त्या बाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. यावर भाजपाने जोरदार आक्षेप घेतला.
मलबार हिल आणि राणीचा बाग येथील बंगले महापौरांसाठी सोयीस्कर नाहीत. सध्या महापौर बंगल्याचा विषय गाजत असल्यामुळे महापौरांसाठी या भूखंडावर बंगला बांधून देण्यात यावा, अशी मागणी कोटक यांनी केली.
महापौर बंगल्यासाठी हा भूखंड योग्य असून या ठिकाणी पश्चिम, पूर्व आणि शहरातील नागरिक व नगरसेवकांना पोहचणे सहज शक्य असल्याचं कोटक यांनी सांगितलं.
या भूखंडावर जिमखाना बांधायचा असल्यास भूखंडाचं आरक्षण बदलावं लागणार आहे. तसंच सीआरझेडबाबतही मंजुरी घ्यावी लागणार आहे. यामुळे सध्या प्रस्तावात दाखवण्यात आलेल्या रकमेमध्ये वाढ होणार असल्याने त्याला भाजपाने विरोध केला.
भाजप सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्याकडे मतदान घेण्याची मागणी केली. दरम्यान यावेळी मतदान घेताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेने जिमखान्याचा प्रस्ताव मंजूर करुन घेतला. यामुळे संतापलेल्या भाजप सदस्यांनी सभात्याग केला.