BMC : भाजपचे स्वीकृत नगरसेवकांची नावं ठरली, 'या' चार जणांना मिळणार मुंबई महापालिकेत संधी
BJP Co-opted Corporaters : संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला चार स्वीकृत नगरसेवकांचा कोटा आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवकांचा कोटा आहे.

मुंबई : शिवसेनेपाठोपाठ आता भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची यादीही अंतिम झाली असून त्यांच्या नावाचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे देण्यात आला आहे. भाजपकडून प्रतिक कर्पे, कमलाकर दळवी, नितेश राजहंस सिंह, प्रवीण छेडा यांना स्वीकृत नगरसेवकपदासाठी संधी मिळणार आहे.
मुंबई महापालिकेसाठी आधी शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकांची यादी आयुक्तांना देण्यात आली. त्यानंतर आता भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांचा प्रस्ताव मुंबई महापालिकेत देण्यात आला आहे. प्रतिक कर्पे, कमलाकर दळवी, नितेश राजहंस सिंह, प्रवीण छेडा यांच्या नावांचा प्रस्ताव भाजप गटनेते यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर पालिका आयुक्तांकडे देण्यात आला आहे.
भाजपच्या वाट्याला चार स्वीकृत नगरसेवकांचा कोटा आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन स्वीकृत नगरसेवकांचा कोटा आहे. तर संख्याबळाच्या तुलनेत ठाकरेंच्या शिवसेनेकडे तीन स्वीकृत नगरसेवकपद असणार आहे.
BMC Election Result 2026 : मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल
- भाजप - 89
- शिवसेना ठाकरे गट - 65
- शिवसेना शिंदे गट - 29
- काँग्रेस - 24
- मनसे - 6
- एमआयएम- 8
- राष्ट्रवादी - 3
- समाजवादी पार्टी - 2
- राष्ट्रवादी (SP) - 1
एकूण- 227
शिंदेंच्या शिवसेनेकडून दोन नाव अंतिम
मुंबई महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी दोघांना संधी देण्यात आली आहे. या दोन्ही जागा मुंबईतल्या मागाठाणे मतदारसंघात दिल्या जात असल्याने पक्षात चर्चांना तोंड फुटलंय. माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि आमदार प्रकाश सुर्वेंचा मुलगा राज सुर्वे यांना संधी देण्यात आली. मुलाला निवडणुकीत उमेदवारी न दिल्यामुळे प्रकाश सुर्वे नाराज होते. ही नाराजी दूर करण्यासाठीच पक्षाने राज सुर्वेंना संधी दिल्याचं बोललं जात आहे.
प्रकाश सुर्वे हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या मुलाला मागाठाणे परिसरातून उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही होते. मात्र, याठिकाणी भाजप आणि शिवसेनेत प्रचंड रस्सीखेच असल्याने प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला तिकीट नाकारण्यात आले होते. यामुळे प्रकाश सुर्वे नाराज झाल्याची चर्चा होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांचा मुलगा राज सुर्वे याला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.
माजी नगरसेवक बालकृष्ण ब्रीद आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांचा समावेश असल्याचे समजते. पालिकेच्या निवडणुकीवेळी पक्षाने बाळकृष्ण ब्रीद यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र कागदपत्रांच्या त्रुटींमुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही. त्यावेळी त्यांनी पक्षाने दिलेला एबी फॉर्म अपक्ष उमेदवाराला दिला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. ही शक्यता खरी ठरली आहे.
ही बातमी वाचा:
























