ठाणे : भाजपच्याच खासदारांना मोदी नकोसे झाले असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी केला. भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडून सध्या मोदींना पक्षांतर्गत पर्याय शोधण्याचं काम सुरु असून त्यात नितीन गडकरी, राजनाथ सिंग, सुषमा स्वराज अशी नावं आघाडीवर आहेत, असा दावा केतकर यांनी केला.


ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात 'विभाजित राजकारण आणि मंदावलेली अर्थव्यवस्था' या विषयावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात पी. चिदंबरम यांच्यासह खासदार कुमार केतकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण सहभागी झाले होते.

सध्या मोदींना पर्याय कोण? असा प्रश्न विचारुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची त्यांच्याशी तुलना केली जाते. यातून मोदी हेच अपरिहार्य असल्याचं जनतेच्या मनावर बिंबवलं जातं. मात्र आमच्या महागठबंधनमध्ये पंतप्रधानपदाचे अनेक उमेदवार आहेत, असं केतकर म्हणाले.

येत्या निवडणुकीत भाजपचे 282 तर दूरच, पण मुश्किलीने 150 खासदार निवडून येतील, असंही केतकर म्हणाले.

इंधन दरवाढीवरुन पी. चिदंबरम यांची टीका

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑईलचे दर कमी असूनही तुमच्याकडून पेट्रोल डिझेलचे जास्त पैसे घेतले जात आहेत, असं म्हणत मोदी सरकार तुमचं पाकीट मारत असल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली.

नोटबंदीचा निर्णय पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचं चिदंबरम म्हणाले. देशात सुळसुळाट झालेल्या खोट्या नोटा रोखणं, दहशतवाद कमी करणं, काळा पैसा कमी करणं असे या निर्णयाचे प्रमुख उद्देश होते. मात्र या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेत एकूण चलनाच्या अवघ्या 0.2 टक्के खोट्या नोटा जमा झाल्या. शिवाय दहशतवाद्यांकडेही पुढच्या 15 दिवसात दोन हजाराच्या खोट्या नोटा सापडल्या. काळा पैसा तर अजूनही प्रत्येक ठिकाणी सुरु आहे, कारण भारतात पैसे दिल्याशिवाय काहीच होत नाही, असं चिदंबरम म्हणाले.

जीएसटीची संकल्पना काँग्रेसची असून ती 'गुड अँड सिम्पल टॅक्स' अशी होती, मात्र आताच्या सरकारने ती 'गब्बर सिंग टॅक्स' अशी केल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली.

इंधन दरवाढीवरुनही चिदंबरम मोदी सरकारवर हल्ला चढवला. काँग्रेसच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे सरासरी दर 105 डॉलर प्रतिबॅरेल होते, तरीही पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर होते. मात्र त्यानंतर हे दर 26 डॉलरपर्यंत खाली येऊन आता 78 डॉलरवर आले आहेत. मात्र तरीही तुमच्यावर इंधन दरवाढ लादली जात असून सरकार तुमचं पाकीट मारत आहे, अशी टीका चिदंबरम यांनी केली.