मुंबई : महापालिका निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वात मोठी बातमी आली ती म्हणजे बिहार सरकार मुंबईत बिहार भवन (Bihar Bhavan) बांधणार असल्याची. प्रशासकीय कामकाजासाठी आणि बिहारच्या नागरिकांसाठी सोईचं होण्यासाठी तब्बल 314 कोटी रुपये खर्च करून मुंबईत 30 मजली बिहार भवन बांधण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एलफिंस्टन इस्टेट 0.68 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. या बिहार भवनला मनसेने विरोध केला आहे. 

Bihar Bhavan Maharashtra : कायदा काय सांगतोय? 

भारत हे संघराज्य (Federal Structure) असल्यामुळे संविधानातील कलम 298 (Article 298) नुसार एखादे राज्य दुसऱ्या राज्यात त्याच्या प्रशासकीय कामकाजासाठी कार्यालय सुरू करू शकते, किंवा जमिनीची खरेदी विक्री करू शकते. पण ते स्वतःहून नाही, तर ज्या राज्यात भवन उभारायचे आहे त्या राज्याच्या पूर्व परवानगीनेच हे करता येतं.

एकमेकांच्या हद्दीत जमीन, इमारत, कार्यालय उभारण्यासाठी परस्पर संमती अनिवार्य असते. त्यासाठी ती जमीन 30, 60 किंवा 90 वर्षांच्या भाडेतत्वावर (Lease) घेता येऊ शकते, किंवा त्याची थेट खरेदीही करू शकते. 

बिहारला जर महाराष्ट्रात बिहार सदन उभे करायचं असेल तर त्यासाठी पहिल्यांदा मुंबई महापालिकेची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंर नगरविकास खात्याची परवानगी घ्यावी लागेल आणि शेवटी त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी लागेल. 

Bihar Bhavan : भवनाचा वापर कशासाठी?

एखाद्या परराज्यात असं भवन उभे करण्यामागे काही हेतू असतात. त्या राज्याच्या अधिकाऱ्यांसाठी निवास किंवा पर्यटक, विद्यार्थी, रुग्ण नातेवाईक यांच्या सोईसाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी अशा भवनची निर्मिती केली जाऊ शकते. ते राजकीय सत्ता केंद्र नसते, तर प्रशासकीय-सांस्कृतिक सुविधा केंद्र असते.

Maharashtra Sadan : मुंबईत कोणत्या राज्यांची अधिकृत भवनं आहेत?

मुंबईत आणि मुंबई महानगर परिसरात अनेक राज्यांची अधिकृत भवनं किंवा सदनं आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेश भवन, तेलंगणा भवन, राजस्थान भवन, गुजरात भवन (ट्रस्ट व सरकारी मिश्र स्वरूप), कर्नाटक भवन, केरळ भवन, दिल्ली सरकारचे लायझन ऑफिस / गेस्ट हाऊस, उत्तर प्रदेश भवन (मुंबईत विविध कार्यालये/विश्रामगृहे) यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांची भवनं दिल्लीमध्ये आहेत.

Bihar Bhavan In Mumbai : बिहार भवनमुळे वाद का?

मुंबईत अनेक राज्यांची भवनं या आधीच आहेत, मात्र मग बिहार भवनवरुनच वाद का निर्माण झाला? तर हा वाद कायदेशीरपेक्षा राजकीय आणि भावनिक आहे. कारण मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. तब्बल 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मुंबई मिळवली आहे. 

सध्याचा विचार करता मुंबईत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयांचे स्थलांतर होत आहे. रोजच्या रोज लाखोंचे लोंढे मुंबईत आदळताना दिसतात. त्यामुळे मुंबईच्या लोकसंख्येत मोठा बदल झाल्याचं दिसतंय. त्यामुळे मराठी टक्का कमी होतोय आणि हिंदी भाषिक प्रभाव वाढताना दिसतोय. 

एखादा मराठी भाषिक व्यक्ती जर इतर राज्यात गेला तर तो तिथल्या भाषेचा आणि संस्कृतीचा आदर करतो, तिथली भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो. पण उत्तर भारतीयांमध्ये हे एकदम उलट आहे. मुंबईमध्ये गेली 20-30 वर्षे राहूनही अनेक हिंदी भाषकांना मराठी येत नाही, ती शिकण्याचा प्रयत्न करत नाही किंवा तशी त्यांना गरज वाटत नाही. त्यामागे इथल्या राजकर्त्यांकडून मतांसाठी उत्तर भारतीयांचं केलं जाणारं लांगुलचालन होय. 

हिंदी भाषिक लोक मुंबईत येतात आणि त्यांचे सण, संस्कृती इथल्या लोकांवर लादताना दिसतात. हे एक प्रकारचं सांस्कृतिक अतिक्रमणही म्हणू शकतो. त्यामुळे हळुहळू इथली मूळ भाषा आणि मराठी संस्कृती धोक्यात येण्याची शक्यता आहे.