ठाणे : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दिलेल्या उत्तरानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. अनेक जण पैशांसाठी पाकिस्तानला भारतातील माहिती पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जण यामध्ये असल्याची माहिती समोर आली होती, त्या सर्वांची चौकशी, तपास सुरू असतानाच पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचे आणखी एक प्रकरण चर्चेत आलं होतं. मुंबई डॉकयार्डमधील अभियंता-तंत्रज्ञ रविकुमार वर्मा (35, रा. कळवा, ठाणे) याला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) गुरुवारी अटक केली. वर्मा भारतीय नौदलाची गोपनीय माहिती एका पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला पुरवत होता. त्याच्या संपर्कातील आणखी दोन जणांविरोधातही शासकीय गुपिते अधिनियम (ओ.एस.ए.) आणि यूएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान रविकुमार वर्माबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनंतर आता ठाण्याच्या रविकुमार वर्मा हेरगिरी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. रविकुमार वर्माची हनिट्रॅपची बतावणी खोटी असल्याचं उघड झालं आहे, रवी वर्माने पैशांच्या बदल्यात जाणीवपूर्वक माहिती पाकिस्तानला दिल्याचं तपासात समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्यानंतर मोठी रक्कम वर्माच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. मुंबईतील डॉकयार्डमधील हा कर्मचारी एका पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) च्या संपर्कात होता. एटीएसच्या तपासात याबाबतची माहिती उघड झाली आहे, भारत सरकारने प्रतिबंधित केलेली अत्यंत संवेदनशील माहिती त्याने या गुप्तहेर महिलेला पुरवली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने वर्माची कसून चौकशी केली असता, नोव्हेंबर 2024 मध्ये फेसबुकवरून त्याची ओळख संबंधित पीआयओसोबत झाल्याचे समोर आले होते. नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत त्याने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे वेळोवेळी गोपनीय माहिती तिला पुरवली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करताना एटीएसने वर्माला अटक केली. 

हनी हनिट्रॅपची बतावणी खोटी

रविकुमार वर्मा मागील पाच वर्षांपासून मुंबई डॉकयार्डमध्ये कनिष्ठ अभियंता-तंत्रज्ञ म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता. गेल्या दोन वर्षांत तो एका पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या संपर्कात आला. त्या महिलेने त्याच्याशी मैत्री करत, प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्याच्याकडून भारतीय नौदलाशी संबंधित महत्त्वाची गोपनीय माहिती व्हॉट्सअॅपद्वारे मिळवली, अशी माहिती समोर आली होती, मात्र फक्त पैशांसाठी त्याने माहिती पाकिस्तानला पुरवल्याचं समोर आलं आहे.

वर्मा अविवाहित असून ठाण्याच्या कळवा भागातील स्वतःच्या मालकीच्या घरात राहत होता. चौकशीत असेही उघड झाले आहे की, त्याने दिलेल्या माहितीच्या बदल्यात पाकिस्तानातील संबंधित महिलेने त्याच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा केली होती. या व्यवहारात नेमकी किती रक्कम जमा झाली, ती कोणी आणि कुठून पाठवली, तसेच वर्माने अजून कोणकोणती माहिती दिली, याचा तपास सध्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत आहे.