Bhiwandi Crime : भिवंडीतील स्वीकृत नगरसेवकाला बेड्या; 50 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं
Bhiwandi Crime : 50 लाख रुपयांची लाच स्वीकारताना भिवंडी पालिका काँग्रेस स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांना लाच लुचपत प्रतिबंधक ठाणे यांनी अटक केली आहे.

Bhiwandi Crime : भिवंडीत अनाधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी व्यापाऱ्यांकडून दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती. शहरातील पद्मा नगर परिसरात भाजी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून 50 लाख रुपये लाच स्वीकारत असताना ठाणे लाचलुचपत विभागानं त्यांना रंगेहात अटक केली आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यानच्या काळात या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी सिद्धेश्वर कामूर्ती यांनी जोर दिला होता. येथील व्यापाऱ्यांच्या संपर्कात येऊन या बांधलेल्या गाळ्यावर कारवाई करायची नसेल तर व्यापाऱ्यांकडून दोन कोटी रुपयांची लाच मागितली होती. जर हे पैसे दिले नाही तर एक फार्म हाऊस आणि 50 लाख रुपये, द्यावे लागतील असं सांगितलं. त्यानंतर व्यापाऱ्यांनी स्थानिक आमदार महेश चौगुले यांच्याकडे धाव घेतली. संबंधित प्रकार सांगितला समस्या जाणून घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी संबंधित प्रकाराची लाचलुचपत विभागाला माहिती दिली. धडा शिकवला गेला पाहिजे म्हणून व्यापाऱ्यांचे प्रमुख राजकुमार चव्हाण यांनी ठाणे लाचलुचपत विभागाकडे संबंधित माहिती दिल्यानंतर काल (बुधवारी) पद्मा नगर भाजी मार्केट परिसरात स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांना पहिली किस्त 50 लाख रुपये लाच स्वीकारत असताना ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे .
भिवंडी शहरातील पद्मानगर या मुख्य बाजारपेठेत भिवंडी ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे उभारलेल्या 67 व्यापारी गाळे उभारले असून यावर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस स्वीकृत नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देऊन केली होती. महसूल विभागाच्या नावे असलेली शहरातील मौजे कामतघर येथील 60 गुंठे जागा सदर सोसायटीस शेतकऱ्यांच्या विकासासाठी देण्यात आली होती. त्या जागेवर भात गिरणी, गोदाम सोसायटीचे कार्यालय होते. त्याचा फायदा पंचक्रोशीतील शेकडो शेतकऱ्यांना होत होता. सोसायटीचे सभापती कमलाकर टावरे यांनी येथील भात गिरणी पंधरा वर्षांपासून बंद करून त्या जागेचा वाणिज्य वापर सुरु केला होता. दरम्यान पालिकेने रस्ता रुंदीकरण करीत तेथे सिमेंट कॉक्रीटचा रस्ता बनविला असता, रस्ता रुंदीकरणात येथील गाळे बाधित झाल्याचा फायदा घेत या जागेवर तळ मजला अधिक एक मजली वाणिज्य इमारत उभारून तब्बल 67 गाळे उभे केले. ते 20 हजार रुपये प्रति चौ फुटाने विक्री करून 50 ते 60 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप नगरसेवक सिद्धेश्वर कामूर्ती यांनी केला होता. सर्व अनधिकृत बांधकामांवर पालिकेने त्वरित कारवाई करावी, अन्यथा उच्च न्यायालयात या विरोधात दाद मागितली जाईल, असा इशारा सिद्धेश्वर कामूर्ती यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
