भिवंडी : भिवंडीमध्ये कौटुंबिक वादातून तरुणाची चुलतभावाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी मोगेश म्हात्रे याने साथीदारासह 26 वर्षीय चुलतभाऊ पंकज म्हात्रेची हत्या केली. धारदार चॉपर छातीत खुपसल्यामुळे पंकजचा मृत्यू झाला.


नारपोली पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक जोशीला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी मोगेश म्हात्रेचा शोध घेतला जात आहे.

भिवंडीतील काल्हेर गावात पंकज प्रकाश म्हात्रे हा तरुण कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याचा चुलत भाऊ मोगेश सुनिल म्हात्रे घराशेजारी राहत होता. गेल्या कित्येक वर्षांपासून दोघांमध्ये वडीलोपार्जित जमिनीच्या हक्कावरुन वाद होता. त्यामुळे दोन कुटुंबांमध्ये कित्येक वर्ष वाद धुमसत होता.

पंकज आपल्या मित्रांसोबत 'प्रिन्स इन्टरप्रायझेस' या हरेश जोशी यांच्या कार्यालयात कॅरम खेळत बसला होता. त्यावेळी मोगेश आणि त्याचा साथीदार आले आणि मोगेशने पंकजला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पंकज कार्यालयाबाहेर आला असता त्यांच्यात वाद सुरु झाला. बेसावध असलेल्या पंकजच्या छातीत मोगेशने धारदार चॉपर खुपसला.

पंकज जागेवरच तडफडू लागला. त्यावेळी हल्लेखोर मोगेश आणि त्याचा साथिदार अभिषेक घटनास्थळावरुन पसार झाले. मित्रांनी पंकजला काल्हेर गावातील एस एस हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे पंकजचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.