मुंबई: "भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल. येत्या 9 तारखेला उमेदवार घोषित करु", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केलं.


इतकंच नाही तर "खासदारकीचा राजीनामा देत, भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत. ते मला लहान भावासारखे आहेत. येणाऱ्या काळात सोबत कार्य करु", असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. तर 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

28 मे रोजी गोंदिया-भंडारा आणि पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.

जागेचा पेच सुटणार?

2014 ची लोकसभा निवडणूक लढवून नाना पटोले सत्तेवर आले. पटोलेंनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला. मात्र भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नाना पटोले पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस ही जागा सोडण्यास तयार नसल्याची चर्चा होती.

दुसरीकडे आम्ही जिंकलेली जागा आम्हीच लढवणार, त्याला पर्याय नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे पोटनिवडणुकीसाठी भंडारा- गोंदियाच्या जागेवर दावा केला होता.

त्यामुळे या जागेवर नेमका कोण उमेदवार देणार याबाबतची उत्सुकता लागली आहे. 

प्रफुल्ल पटेल भावासारखे : नाना पटोले

उमेदवार कुणीही असो, एकमेकांना मदत करु, असं म्हणत भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनी लोकसभा पोटनिवडणुकीबाबत सावध पवित्रा घेतला. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी  प्रफुल्ल पटेल हे आपल्याला भावासारखे आहेत, असं म्हटलं होतं.

भंडारा गोंदियातील प्रफुल्ल पटेल आणि माझ्यातील वाद संपलेला आहे. भंडारा-गोंदिया भाजपमुक्त करण्यावर एकमत झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊन ही निवडणूक लढेल. वरिष्ठ येत्या दोन दिवसात निर्णय घेतील. जो निर्णय देतील तो दोघांनाही मान्य असेल.”, अशी भूमिका नाना पटोले यांनी जाहीर केली.

संबंधित बातम्या 

प्रफुल्ल पटेल भावासारखे, भंडारा-गोंदियात एकमेकांना मदत करु : पटोले  

भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक कोण लढवणार?  

गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा  

मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाने वकिलाला फोनवरुन धमकावलं : पटोले  

भाजपचे माजी खासदार नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार  

माजी खासदार नाना पटोलेंची घरवापसी, काँग्रेसमध्ये प्रवेश  

फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल विरोधात असतील तरच लढेन: नाना पटोले