Best Strike: बेस्ट सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा संप सुरू होता. या कर्मचाऱ्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य होताच संप मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत मध्यरात्री बैठक झाली या बैठीकत त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर आजपासूनच संप मागे घेत आल्याची घोषणा करण्यात आली आहे. सर्व आगारातील कंत्राटी कर्मचारी एकत्र येत आझाद मैदानात याबाबत घोषणा केली आहे.
बेस्ट कंत्राटी कामगारांच्या 'या' मागण्या मान्य
- कामगारांचे ( Basic Salary ) पगार 18,000 ( अठरा हजार ) करण्यात येणार
- कामगारांच्या वार्षिक रजा ( CL / SL / PL ) भरपगारी करण्यात येणार, प्रवास मोफत देणार
- कामगारांना वार्षिक दिवाळी बोनस देण्यात यावा
- कामगारांना साप्ताहिक सुट्टी पगारी
- कामगारांना वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी यावर कंपन्याना सूचना देणार
- गेल्या सात दिवसाचा पगार देणार
मुंबईला ज्याप्रकारे मुंबई लोकल तारते त्याप्रकारे येथे बेस्ट बस देखील उत्तम सेवा देताना दिसत असते. मात्र गेल्या आठ दिवसापासून बेस्ट मुंबईकरांवर ती नाराज होती. बेस्ट बस कंत्राटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केलं होते. गेले आठ दिवस मुंबईकर हैराण होते. मात्र यावर तोडगा काढण्यास सरकार प्रशासनाला यश आले आहे.
सामान्य माणसाचे सरकार आहे म्हणून सर्व मागण्या मान्य झाल्या
दिवाळी बोनस, साप्ताहिक रजा, वार्षिक वाढ मान्य केली आहे. येण्या जाण्याचा पास मोफत दिला जाणार आहेत. आंदोलन केले म्हणून कारवाई केली जाणार नाही. निवृत्त लोकांना सेवेत घेतले जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी काल आश्वासन दिले होते. त्यामुळे बेस्ट कंत्राटी कामगारांनी संप मागे घेतला आहे. सामान्य माणसाचे सरकार आहे म्हणून सर्व मागण्या मान्य झाल्या असून आजपासून सगळे कामगार ठरवून दिलेल्या वेळेत कामावर जाणार असल्याची प्रतिक्रिया कामगारांनी दिली आहे.
बेस्टमध्ये कंत्राटी बसेस का?
आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट प्रशासनाने खर्च कमी करण्यासाठी आपल्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने बस ताफ्यात घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी निविदा काढण्यात आल्यात. बस आणि चालक यांची नियुक्ती कंत्राटदाराकडून करण्यात येते. तर, निविदेत निश्चित केलेली रक्कम कंत्राटदाराला बेस्टला द्यावी लागते. यामुळे नवीन बस खरेदी आणि नवीन चालकांची नियुक्ती बेस्टला करावी लागत नाही. त्याच्या परिणामी बेस्टची काही प्रमाणात बचत झाली. कंत्राटदाराकडून बेस्टच्या मिनी एसी बस, एसी बस, इलेक्ट्रीक बस चालवण्यात येते. मुंबईत विविध आगारात वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून सेवा पुरवण्यात येते.