मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या बेस्ट बसच्या तिकीट दरात कपात होणार आहे. प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी 'बेस्ट' उपक्रमाने नव्या भाडेदराचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे बेस्ट बसचं किमान भाडं आठ रुपयावरुन पाच रुपये केलं आहे. पाच किमी अंतरासाठी मुंबईकरांना पाच रुपये भाडं द्यावं लागणार आहे.

बेस्ट समितीच्या आज झालेल्या बैठकीत नव्या तिकीट दराला मंजुरी देण्यात आली. सध्या बेस्टचे किमान भाडे आठ रुपये आहे. मागील काही वर्षांत उत्पन्न वाढीसाठी आणि वाढत्या खर्चांचा मेळ घालण्यासाठी बेस्टच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. आता मुंबईकरांना आठ ऐवजी पाच रुपये मोजावे लागणार आहेत.

बस भाडे (बिगर वातानुकूलित)

5 किलोमीटर 5 रुपये
10 किलोमीटर 10 रुपये
15 किलोमीटर 15 रुपये
15 पेक्षा अधिक किलोमीटर 20 रुपये

बस भाडे  (वातानुकूलित)

5 किलोमीटर 6 रुपये
10 किलोमीटर 13 रुपये
15 किलोमीटर 19 रुपये
15 पेक्षा अधिक किलोमीटर 25 रुपये

मुंबईत होणारी वाहतूक कोंडी, शेअर टॅक्सी-रिक्षामुळे होणारी स्पर्धा, प्रवाशांनी फिरवलेली पाठ, यामुळे बेस्टच्या आर्थिक तोट्यात दिवसेंदिवस वाढ होत होती. प्रवाशांचा ओढा बेस्टकडे वाढवण्यासाठी बसचे तिकीट दर कमी करण्याची मागणी वारंवार होत होती. अखेर ही मागणी आज मंजूर झाली आहे.