मुंबई :सुमारे 370 हेक्टर क्षेत्रात पसरलेले वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) मुंबईतील एक प्रमुख व्यावसायिक आणि आर्थिक केंद्र आहे. आर्थिक घडामोडींचे हे महत्त्वाचे केंद्र सतत विकसित होत आहे. येथे रोजगाराच्या संधी वाढत आहेतच, त्यासोबतच येथे येणाऱ्यांची संख्यादेखील वाढत आहे. आजच्या घडीला बीकेसी हे मुंबईच्या वित्त, व्यवसाय आणि नवोन्मेषाचे प्रमुख केंद्र झाले आहे. सध्या येथे दररोज सुमारे 2 लाख कर्मचारी आणि 4 लाखांहून अधिक अभ्यागत येतात आणि गर्दीच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी ही येथील एक गंभीर समस्या झाली आहे. सायन पूल बंद असल्यामुळे बहुतांश वाहतूक वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात वळवण्यात आली आहे. बीकेसी मार्ग हे प्रामुख्याने लहान वाहनांसाठी अनुकूल असल्याने, सध्या ट्रक तसेच अवजड वाहने व मालवाहतूक वाहनांचा प्रवास या मार्गावरून होत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी एमएमआरडीएने तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचे ठरविले आहे.
ही समस्या हाताळण्यासाठी प्राधिकरणाच्या टीमने एक विस्तृत वाहतूक व्यवस्थापन योजना तयार केली आहे. सध्याच्या आणि भविष्यातील संभाव्य वाढीची शक्यता, प्रवाशांची वाढती संख्या, सध्या सुरू असलेली पायाभूत सुविधा विकासकामे आणि भागधारकांच्या अभिप्रायांचे सखोल विश्लेषण करून ही योजना तयार करण्यात आली आहे.
बीकेसी हे सार्वजनिक परिवहन सुविधांच्या माध्यमातून उत्तम प्रकारे जोडले गेले असले, तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. विशेषत: वांद्रे-कुर्ला लिंक रोडवर कलानगर जंक्शनपासून भारत डायमंड बोर्सपर्यंत वाहतूक कोंडी होते. शीव उड्डाणपुलाचे पुनर्निर्माण, इत्यादी पायाभूत विकासकामांमुळे येथील वाहतुकीची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
बीकेसीसाठी एमएमआरडीएने तयार केलेल्या तपशीलवार वाहतूक व्यवस्थापन योजनेला प्राधिकरणाच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरण बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुंबई वाहतूक पोलिस विभागाच्या सहयोगाने तयार केलेली ही योजना हे दीर्घकालीन वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दिशेने एक धोरणात्मक पाऊल आहे.
1. सायकल ट्रॅकचे ट्रॅफिक लेनमध्ये रूपांतर
बीकेसीतील कमी प्रमाणात वापरात असलेला सायकल ट्रॅक मार्गिकेत रूपांतरित करण्यात येतील. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढेल. परिणामी, प्रत्येक मार्गिकेची वाहतूक क्षमता 600–900 वाहनांनी वाढेल अशी अपेक्षा आहे. रस्त्यावरील दिवे, साइनबोर्ड, झाडे, बस थांबे आणि सुशोभीकरणासाठी लावलेले घटक पदपथावर हलविण्यात येतील. त्यामुळेही रस्त्याची रुंदी वाढण्यास मदत होईल.
सायकल ट्रॅक काढल्याचे फायदे
या उपक्रमाचा भाग म्हणून सायकल ट्रॅक काढून रस्त्याचे रुंदीकरण 2+2 लेन वरून 3+3 लेन करण्यात येईल – म्हणजेच रस्ता रुंदीकरणात सुमारे 50% वाढ होणार आहे. परिणामी, गर्दीच्या वेळेतील प्रवासाचा कालावधी 25 मिनिटांवरून 15 मिनिटांपर्यंत कमी होईल या 10 मिनिटांमुळे प्रवासी वेळेत 40% बचत होणार आहे .
त्याचप्रमाणे, सिग्नल किंवा अरुंद जागांवर प्रतीक्षा वेळ 10 मिनिटांवरून 7 मिनिटांपर्यंत कमी होईल. ३ मिनिटे म्हणजे वेळेत (३०%) बचत. अशा निष्क्रिय वेळेत ही घट कार्बन उत्सर्जन कमी करेल. एक पेट्रोल कार दर किमीला सुमारे 170 ग्रॅम CO₂ उत्सर्जित करते, सरासरी 40 किमी/तास वेगाने 2.3 किमीचा प्रभावी वेळ/अंतर बचत लक्षात घेता, CO₂ उत्सर्जन 30% ने कमी होणार अपेक्षित असून ते प्रति वाहन 1133 ग्रॅमवरून 793 ग्रॅम इतके होईल.
प्रस्तावित योजनेमध्ये खालील बदलांचा समावेश आहे :
* सध्या असलेल्या 2+2 मार्गिका (7 मीटर + 7 मीटर) आणि 2.7 मीटरचा सायकल ट्रॅक → हा रस्ता 3+3 मार्गिकांचा करण्यात येईल (9.7 मीटर + 9.7 मीटर)* सध्या असलेल्या 2+2 मार्गिका (7 मीटर + 7 मीटर) आणि 1.5 मीटरचा सायकल ट्रॅक → हा रस्ता 3+3 मार्गिकांचा करण्यात येईल (8.5 मीटर + 8.5 मीटर)* सध्या असलेली 1+1 मार्गिका (3.5 मीटर + 3.5 मीटर) आणि 1.5 मीटरचा सायकल ट्रॅक → हा रस्ता 2+2 मार्गिकांचा करण्यात येईल (5.0 मीटर + 5.0 मीटर)
2. बीकेसीमध्ये एकेरी वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी
वाहनांचे अंतर्गत दळणवळण सुरळीत करण्यासाठी बीकेसीमधील सर्वात व्यस्त भागातील कोंडी कमी करण्यासाठी बीकेसी भागात एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात येईल. तज्ज्ञांच्या शिफारसी व वाहतुकीचा अभ्यास यांच्याआधारे ही उपाययोजना राबविल्याने वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल आणि कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.एमएमआरडीएच्या सक्रिय व डेटा-आधारित दृष्टिकोनातून, बीकेसी हे एक प्रभावशाली आणि कार्यक्षम आर्थिक केंद्र घडविण्यासंदर्भातील एमएमआरडीएची वचनबद्धता दिसून येते.
वाहतूक कोंडीपासून तात्काळ दिलासा देणे आणि भविष्यात वाढणाऱ्या वाहतूक व पादचाऱ्यांच्या वर्दळीला शाश्वतपणे आणि योग्य पद्धतीने वाढत्या हाताळणे यासाठी तात्काळ व दीर्घकालीन उपाय केले जात आहेत.
एमएमआरडीएचे अधिकारी म्हणाले,
"एमएमआरडीएच्या या धोरणात्मक योजनेच्या माध्यमातून रस्ता रुंदीकरण व एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करून आम्ही बीकेसीमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहोत. या उपाययोजनांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाला लागणारा वेळ कमी होईल आणि प्रवाशांसाठी बीकेसी अधिक सुलभ व ॲक्सेसिबल होईल. बीकेसीचे वाढणारे आर्थिक महत्त्व आणि अभ्यागतांची वाढती संख्या लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. "