Bandra Fire : वांद्रे येथील लिंकिन रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमा शोरूममध्ये अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामुळे क्रोमा शोरूमचे मोठे नुकसान झाले आहे. पहाटे 4 वाजता आग लागल्याची माहिती मिळत असून अग्निशमन दल अजूनही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. 

लिंक स्क्वेअर मॉल ही चार मजली इमारत आहे. क्रोमा शोरूमच्या तळघरात आग लागली होती जी वरच्या मजल्यांवर पसरत असल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दल वृत्त नाही. 

अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणामुळे आग वाढली - झीशान सिद्दीकी

वांद्रे मॉलमध्ये आग लागल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झीशान सिद्दीकी म्हणाले की, "आम्ही पहाटे 4 वाजल्यापासून येथे आहोत. अग्निशमन दलाच्या निष्काळजीपणामुळे ही आग पसरली आहे, हे मी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो. आम्ही आणि सामान्य नागरिक पहाटे 4 वाजल्यापासून येथे आहोत. बेसमेंटमधील क्रोमामध्ये एक छोटीशी ठिणगी पडली. आम्ही त्यांना आणखी पाणी आणण्याची विनंती केली, पण त्यांच्याकडे उपकरणे नव्हती. त्यांच्याकडे उपकरणे असली तरी ती कशी वापरायची हे त्यांना माहित नव्हते. हे खूप दुर्दैवी आहे. मी वारंवार सांगत होतो की वर एक रेस्टॉरंट आणि सिलिंडर आहेत. पण, अग्निशमन विभागाने माझे ऐकले नाही. सामान्य नागरिकाला माहिती आहे की हा अग्निशमन दलाचा निष्काळजीपणा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली 

दरम्यान, वांद्रे येथील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. सध्या, मॉलच्या आत कोणीही अडकलेले नाही. या अपघातात दुकानदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 

आणखी वाचा 

India Pak War: युद्धाच्या नुसत्या कल्पनेने पाकिस्तानला थरकाप; निवृत्त कर्नल अभय पटवर्धनांनी सांगितली भारतीय लष्कराची जमेची बाजू