भिवंडी : भिवंडी ते वाडा आणि वाडा ते मनोर हा तब्बल 64 किलोमीटरचा राज्य महामार्ग आहे. मात्र यापैकी भिवंडी ते वाडा या रस्त्याला अगदी शापित रस्ता असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे आतापर्यंत हजारो अपघात या रस्त्यावर झाले असून यात शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातांमागे या रस्त्यावरचे खड्डे मुख्य कारण असून सरकारही या रस्त्यांच्या कामाकडे लक्ष देत नसल्याने स्थानिकांनी स्वत:च   रस्ता दुरुस्तीचा विडा उचलला आहे.


वाडा ते भिवंडी या रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्याने या रस्त्यावरून जाणे अतिशय जोखमीचे झाले आहे. तरीही प्रशासन याकडे योग्य लक्ष देत नाही. त्यामुळे यातील वाडा ते अंबाडी या 22 किमीच्या रस्त्यावर एकाच वेळी खड्डे भरो आंदोलन झाले. ज्यामध्ये स्थानिकांच्या सहभागाने 25 जेसीबी, 50 डंपर, 25 पाण्याचे टँकर, 10 रोड रोलर जमा झाले आणि रस्त्यावरी अंदाजे 100 जण वेगवेगळ्या ठिकाणी काम करत हे रस्ते भरण्यात आले. दरम्यान या कामानंतर उर्वरीत कामतरी सरकारने करावे असं आवाहन स्थानिकांनी केलं आहे.


रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी


संबधित रस्ता तयार झाल्यानंतर सुरुवातीला 7 वर्ष सुप्रीम इन्फ्रा कंपनी टोल वसूल करायची. पण 2019 पासून टोल बंद झाला आणि रस्त्याची अधिक दुरावस्था झाली. दरम्यान या रस्त्यासाठी काही महिन्यांपूर्वी सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले. ठेकेदाराने हे पैसे खर्चही केले, ज्यानंतर आता अलीकडे आणखी कोट्यवधी रुपये या रस्त्याच्या कामासाठी मंजूर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून अद्यापही या रस्त्याची अवस्था ठिक नसल्याने तेथील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र ठेकेदार आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभारामुळे हे काम रखडले आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी झालेल्या खर्चाची फौजदारी गुन्हा दाखल करून चौकशी झाली तरच सर्व समोर येईल असं स्थानिकांचं म्हणणं आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha