मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी येऊ लागले आहेत. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायींच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेने अनेक सुविधा पुरविल्या आहेत.


बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनेक अनुयायी काही दिवस आधीच मुंबईत येण्याला प्राधान्य देतात. अशा अनुयायींना वास्तव्याची आणि जेवणाची सुविधा पुरविण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानात त्यासाठी विशेष सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.


याशिवाय महापालिकेच्या 7 शाळांमध्ये अनुयायांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी कोणतेही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. चैत्‍यभूमी प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्ग या 3 ठिकाणी रुग्‍णवाहिकेसह इतर आरोग्‍यसेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.


शिवाजी पार्क मैदान व परिसरात 18 फ‍िरती शौचालये, रांगेत असणाऱ्या अनुयायांसाठी 4 फ‍िरती शौचालये, 380 पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या नळांची व्‍यवस्‍था, पिण्‍याच्‍या पाण्‍याचे 16 टँकर्स, संपूर्ण परिसरात विद्युत व्‍यवस्था करण्यात आली आहे.


मोबाईल चार्जिंगकरता शिवाजी पार्क येथे 300 पॉईंटची व्‍यवस्‍था करण्यात आली आहे. शिवाजी पार्कव्‍यतिरिक्‍त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्‍य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथे देखील तात्‍पुरत्‍या निवाऱ्यासह फि‍रत्या शौचालयांची सोय करण्यात आली आहे.