मुंबई : राज ठाकरेंनी दहिसरमधील प्रचारसभेत शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनामा नाट्यावर राज ठाकरेंनी टीका केली. पाच वर्षात राजीनामे देता आले नाहीत, सरकारमध्ये राहून नुसत्या धमक्या दिल्या. पैशाचं काम अडलं की केवळ आर्थिक हितसंबंधांसाठी राजीनाम्याची धमकी शिवसेनेच्या मंत्र्यांकडून दिली गेली, असा आरोप राज ठाकरेंनी केला.


शिवसेना-भाजपच्या विकासकामांच्या जाहिरातींवरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. शिवसेना-भाजपच्या जाहिरातींमध्ये सगळीकडे लिहिलंय 'हीच ती वेळ', म्हणजे गेली पाच वर्ष नव्हता का यांना वेळ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.


आरेतील दोन हजारांहून अधिक झाडे रातोरात तोडली. लोकांनी आक्रोश केला मात्र उद्धव ठाकरे झाडं तोडल्यावर म्हणतात की सत्तेत आल्यावर आरे जंगल म्हणून घोषित करु. आता काय तिकडे गवत लावणार? शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेबद्दल एक ओळही नाही, तुम्हाला मुर्ख बनवत आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.


राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे




  • शिवसेना-भाजपच्या जाहिराती पहा, सगळीकडे लिहिलंय 'हीच ती वेळ' म्हणजे गेली 5 वर्ष यांच्याकडे वेळ नव्हता का? : राज ठाकरे

  • पैशाचं काम अडलं की, शिवसेना नेते राजीनामा देण्याची धमकी द्यायचे : राज ठाकरे

  • पीएमसी बँकेवर भाजपचे नेते आणि सिटी कोऑपरेटिव्ह बँकेवर शिवसेनेचे नेते आहे आणि हे भ्रष्टाचार दूर करण्याच्या गप्पा मारतात : राज ठाकरे

  • शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेबद्दल एक ओळही नाही, तुम्हाला मुर्ख बनवत आहेत : राज ठाकरे

  • छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात उभारणार होते त्याचं काय झालं : राज ठाकरे

  • पुतळे उभारण्यापेक्षा महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले गड किल्ले नीट राखा : राज ठाकरे

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बनवून साध्य काय करणार? : राज ठाकरे