मुंबई : अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या राजेश पाटील यांचा जमीन अर्ज शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजेश पाटील याच्या जामीन अर्जावर न्यायामूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजेश पाटील याला 10 डिसेंबर 2017 रोजी अटक करण्यात आली होती. पाटीलवर हत्येत सहभाग आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. सध्या पाटील तळोजा जेलमध्ये आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या करुन त्यांचे धड आणि हात, पाय, मुंडके वेगळे करण्यात आले होते. अशी माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे भाईंदरच्या खाडीत फेकण्यापूर्वी अभय कुरुंदकरच्या भाईंदरच्याच घरातील फ्रीजमध्ये ठेवले होते.
या प्रकरणी पोलिसांनी अभय कुरुंदकरसह राजेश पाटील, चालक कुंदन भंडारी आणि मित्र महेश पळणीकर यांना अटक केली आहे. नवी मुंबई क्राईम ब्रँचकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या आरोपींविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 एप्रिल 2016 रोजी चौघा आरोपींनी एकत्र येऊन हत्या केल्याची माहिती आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?
15 एप्रिल 2016 पासून अश्विनी बिद्रे उर्फ अश्विनी राजू गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप कुटुंबाने केला होता. या तपासात पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.
अश्विनी जयकुमार बिद्रे... कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक महत्त्वकांक्षी तरुणी. त्या 2000 सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं.
पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यावेळी त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यात असणाऱ्या वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर 2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजलं.
अश्विनी आणि अभय यांच्यात वाद
अभय कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरने अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही पतीला दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचं कुटुंब व्यथित झालं होतं. या काळातच 2015 साली अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत? या आशयाचं पत्र पोलिस खात्यानेही पाठवलं. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी कळंबोली पोलिसात याची तक्रार दाखल केली.
अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनी यांनी आपल्या संगणकात रेकॉर्ड करुन ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला, त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदकरने भांडणादरम्यान वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचं उघड झालं. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच अभय करुंदकर तात्काळ रजेवर गेला.
संबंधित बातम्या :
अश्विनी बिद्रे हत्या : चॅटिंगमधील एका अक्षरामुळे कुरुंदकरचा गेम ओव्हर
डोक्यात बॅट घालून अश्विनी बिद्रेंची हत्या, आरोपी कुरुंदकरच्या मित्राची कबुली
बेपत्ता पोलिस अश्विनी बिद्रेंना अभय कुरुंदकरांची मारहाण
अश्विनी बिद्रे हत्या : खडसेंच्या भाच्याचा जामीन फेटाळला
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
28 Sep 2018 11:10 PM (IST)
भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजेश पाटील याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -