Ashish Shelar VIDEO: शिवाजी पार्कपासून टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत यांच्या हिंदुत्वाचा रंग विरला; आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंना टोला
Ashish Shelar On Thackeray Brothers : बॉम्बस्फोटमध्ये जखमी झालेल्याला उभं करण्याचं काम किरीट सोमैय्या आणि मुंबई भाजपने केलं. तुम्ही मुंबईसाठी काय केलं असा प्रश्न आशिष शेलारांनी विचारला.

मुंबई : आम्ही मुंबईचे चौकीदार आहोत, सण उत्सव साजरे करणे आमचे अधिकार आहेत. आम्ही भोंगेमुक्त मुंबई करतोय तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हिरवी युक्त मुंबई करता अशा शब्दात राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीका केली. आम्ही हिंदुत्ववादी असल्याच्या घोषणा यांनी शिवाजी पार्कवर केल्या होत्या, पण यांच्या हिंदुत्वाचा रंग काँग्रेसच्या टिळक भवनापर्यत जाऊपर्यंत विरला असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना लगावला. 'भोंगे मुक्त मुंबई' या किरीट सोमय्या यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.
Ashish Shelar On BMC Elections : काय म्हणाले आशिष शेलार?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, "भोंगा बंदीच्या घोषणा खूप लोकांनी केल्या. शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर सभा घेतल्या. यांच्यासाठी एक भोंगा फार प्रिय आहे नऊ वाजताचा. तो भोंगा रोज तोंडावर आपटतो आणि पुन्हा उभा राहतो. आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणणारे शिवाजी पार्कवरून केलेली घोषणा कुठे विरली? काहींनी घोषणा केल्या, त्यानंतर त्यांचे पाय काँग्रेसच्या टिळक भवनाकडे वळले. तुमच्या हिंदुत्वाचा रंग टिळक भावनाकडे जाईपर्यंत विरला."
आशिष शेलार म्हणाले की, "उद्धव ठाकरे हे फोटो आणि ऑनलाइन या पलीकडे दिसले नाहीत. बॉम्बस्फोटमध्ये जखमी झालेल्याला उभं करण्याचं काम किरीट सोमैय्या आणि मुंबई भाजपने केलं. आम्हाला विचारतात, तुमचा मुंबईचा काय संबंध? मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारतो की तुम्ही काय मुंबईसाठी केलं हे सांगा."
Ashish Shelar Thackeray Brothers : रझा अकादमीला का भेटलात?
उद्धव ठाकरे हिरवी मुंबई करायला चालले आहेत. रझा अकादमीच्या सदस्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना का भेटले? राज ठाकरे यांनी रझा अकादमीच्या विरोधात मोर्चा देखील काढला होता, पण हेच मांडी मांडी लावून बसत आहे. आझाद मैदानात स्मारकाची नासधूस केली, पोलिसांवर हात टाकले. त्यांची मते हवी म्हणून त्या अकादमीच्या लोकांना तुम्ही भेट का दिली? असा प्रश्न शेलारांनी विचारला.
ईशान्य मुंबईत उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध का केला? 25 वर्षे तुमचा महापौर होता, म्हणून प्रश्न तुम्हाला विचारतोय, मुंबईत मालवणी पॅटर्नचे समर्थक कोण? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला.
मुंबईतील ध्वनी प्रदूषणाविरोधात आणि नागरिकांना शांततेचं वातावरण मिळावं या उद्देशाने किरीट सोमैया यांनी तयार केलेल्या 'भोंगे मुक्त मुंबई' या पुस्तिकेचं प्रकाशन पार पडलं. या प्रकाशन सोहळ्यात मंत्री आशिष शेलार यांनी पुस्तिकेचे प्रकाशन केलं, तर अध्यक्ष म्हणून मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते. या कार्यक्रमात किरीट सोमैया यांनी मुंबईत भोंग्यांमुळे होणारं ध्वनीप्रदूषण, त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम आणि प्रशासनाने घ्यायच्या उपाययोजनांवर सविस्तर माहिती दिली.


















