मुंबई : ‘पोटनिवडणुकीत मोठे दावे करणार्‍यांचे पोट फाडून भाजपाचा विजय’, अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.


भांडुपमधील वॉर्ड क्रमांक 116 मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार जागृती पाटील यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर जहरी टीका केली.


‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा विश्वास! हा विजय विकासाचाच! सांगा आता वेडे कोण ठरले?’ असंही ट्वीट आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे आता भाजपच्या या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



दरम्यान, या निवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांना तब्बल 11,129 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या  मिनाक्षी पाटील यांना केवळ 6337 मतं पडली आहेत.


भांडुप पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयानंतर सत्ता समीकरणं बदलणार?

भांडुप येथील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर मुंबई महापालिकेतील सत्ता समीकरणांमध्ये बदल होऊ शकतो. सध्या भाजपचे निवडून आलेले 82 नगरसेवक आहेत. तर 2 अपक्षांचा भाजपला पाठिंबा असल्याने संख्याबळ 84 आहे. भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील विजयी झाल्याने भाजपचं संख्याबळ 85 झालं आहे.

शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवक 84 आहेत. तर 4 सहयोगी अपक्षांचा पाठिंबा असल्याने शिवसेनेचं संख्याबळ 88 आहे. यात अपक्षांपैकी चंगेज मुलतानी चुकीच्या जात प्रमाणपत्रामुळे अपात्र ठरतील. मात्र त्या ठिकाणी राजू पेडणेकर या शिवसेनेच्याच दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेल्या उमेदवाराची वर्णी लागेल. त्यामुळे सदस्यसंख्या 88 एवढीच राहिल.

दरम्यान,  भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील यांचा विजय झाला आहे. त्यामुळे बीएमसीतील सत्ता समीकरणं पुन्हा बदलतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेपेक्षा भाजपचे तीन सदस्य कमी आहेत.

संबंधित बातम्या :

मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी

भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार?