Anjali Damania on Rahul Narwekar :  गानसम्राजी पद्मविभूषण आशाताई भोसले (Asha bhosale) यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर विधिमंडळाचे हे पहिलेच अधिवेशन होत असल्याने विधानसभा सभागृहातही त्यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव ठेवण्यात आला होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तो वाचून दाखवली. मात्र, तो शोकप्रस्ताव वाचताना त्यांच्याकडून झालेल्या चुकीचा उल्लेख आणि उच्चारावरुन त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली. दुसरी-तिसरीतील मुलंही याहून चांगलं वाचन करतात असा टोला दमानिया यांनी नार्वेकरांना लगावला. शोकप्रस्ताव वाचनादरम्यान उच्चार व तथ्यात्मक चुका झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.

Continues below advertisement

मी गुजराती कुटुंबात राहूनही यांच्यापेक्षा चांगलं मराठी बोलते

दीनदयाळ मंगेशकर असा उल्लेख झाल्याने दमानियी यांनी टीका केली. हे मराठी नसून SOBO शैलीतील मराठी असावं असे दमानिया म्हणाल्या. मी गुजराती कुटुंबात राहूनही यांच्यापेक्षा चांगलं मराठी बोलते. भाषा, वाचन आणि पदाच्या प्रतिष्ठेवर दमानियांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाला साजेसा अभ्यास आणि भाषेवर प्रभुत्व हवे असे दमानिया म्हणाल्या. सोशल मीडियावर पोस्ट करत दमानियांनी नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. दमानियांच्या टीकेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरेंनींही व्यक्त केला संताप

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul narvekar) यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी? अशा शब्दात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) संतप्त भावना बोलून दाखवल्या.  

Continues below advertisement

आशाताईंच्या निधनाचा हा प्रस्ताव राहुल नार्वेकरांनी स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असतं, कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही.  बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत. भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपलाही टोला लगावला.