Mumbai Metro 7A Train: गुंदवली ते विमानतळ मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा, बोगद्यातून 'दिशा' बाहेर पडताच टाळ्यांचा कडकडाट, मेट्रो 7 कशी असेल?
Mumbai Metro 7A Train: मुंबई मेट्रोच्या 7 अ या मार्गिकेतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. यामुळे आता दहिसरवरुन थेट मुंबई विमानतळ गाठता येणार आहे.

Mumbai Metro Train: मुंबई शहराच्या वेगवान वाहतुकीसाठी विण्यात येणाऱ्या मेट्रो ट्रेनच्या जाळ्यातील एक महत्त्वाचा टप्पा गुरुवारी पूर्ण झाला. मुंबई मेट्रो 7A या मार्गिकेवरील महत्त्वाचा बोगदा आज खणून पूर्ण झाला. बोगदा खणून झाल्यामुळे आता या मार्गावर ट्रॅक बसवण्याचे आणि ओव्हरहेड वायर्स लावण्याच्या कामाला सुरुवात करता येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मेट्रोची 7A (Mumbai Metro 7A) ही मार्गिका कार्यान्वित होऊ शकेल. एमएमआरडीएकडून उभारण्यात येत असलेली मुंबई मेट्रो 7A ही मार्गिका गुंदवली ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडण्यासाठी उभारण्यात येत आहे. आज याच मार्गिकेसाठी जे 1.6 किमीचे भूमिगत बोगदे खणण्यात येत आहेत. त्यापैकी एक बोगदा (Metro Tunnel) आज खोदून पूर्ण होत आहे. दिशा नावाची टनेल बोरिंग मशिनने हा संपूर्ण बोगदा खणला. याच कामाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत.
मेट्रो 7A प्रकल्पाची वैशिष्ट्ये :-
लांबीः ३.४ किमी (उन्नत ०.९४ किमी, भूमिगत २.५०३ किमी)
स्थानके: ०२ (१ - उन्नत (एअरपोर्ट कॉलनी), १ भूमिगत (CSMIA))
उन्नत मेट्रो मार्ग (व्हायाडक्ट): ०.५७ किमी
रॅम्पः ०.३०९ किमी
ट्विन टनेल (दुहेरी बोगद्यांची) लांबी: २.०३५ किमी (व्यास ६.३५ मी.)
टीबीएम प्रकारः ड्युअल मोड हार्ड रॉक टीबीएम
प्रकल्पाचे लाभ
१. मेट्रो मार्ग ७अ मुळे मुंबई महानगर प्रदेशातील विविध मेट्रो मार्ग थेट विमानतळापर्यंत मेट्रोने जोडले जातील.
२. मेट्रो मार्ग ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ या भूमिगत स्थानक व मार्गासोबत सुलभ संलग्निकरण होईल.
३. प्रवाशांसाठी सुरक्षित, आरामदायी व सुलभ प्रवास.
४. बहुपद्धत वाहतूक साधनांचे उत्कृष्ट एकत्रीकरण (Multi Modal Integration).
५. दाटीवाटीच्या नागरी परिसरातून मेट्रोसाठी उन्नत व भूमिगत मार्गाची रचना केल्यामुळे विमानतळ परिसरात मेट्रो बांधकामासाठी कमी जागा व्यापते.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणद्वारे पार करण्यात आलेले अडथळे
१. भारतीय विमानतळ प्राधिकरणा (AAI) कडून प्रकल्पासाठी जमीन ११ ऑक्टोबर, २०२१ रोजी हस्तांतरीत करण्यात आली.
२. बामनवाडा, वाल्मिकी नगर, विलेपार्ले येथील सुमारे २०० झोपडपट्यांचे पुनर्वसन व स्थलांतर करून प्रकल्पांचे काम करण्यात आले.
३. १८०० मिमी व्यासाची भूमिगत सांडपाणी वाहिनी, मायक्रो टनेलिंगच्या सहाय्याने वळविण्यात आली व ३० जानेवारी, २०२३ रोजी कार्यान्वित करण्यात आली.
४. विविध सेवा वाहिन्या जसे २४०० मिमी व्यासाची जलवाहिनी, गॅस पाईपलाईन, सांडपाणी वाहिनी, लघुदाबाच्या विद्युतवाहिन्या, नाले इत्यादी सेवावाहिन्यांचे यशस्वी स्थलांतरण.
५. बोगद्याच्या कामादरम्यान अनपेक्षित पुरचनांशी (कधी ठिसूळ कधी कठीण) अशा विविध भूरचनांसाठी IIT बॉम्बेच्या तज्ञांच्या सल्ल्याने TAM (Tube A Manchette) ग्राउटिंगद्वारे जमीन मजबुतीकरण करण्यात आले.
६. बोगद्याच्या कामादरम्यान P&T कॉलनी भागात मेट्रो मार्ग ३ कुलाबा-वांद्रे-सीप्झ आणि मार्ग७अ चे बोगदे फक्त ६.२ मीटरच्या अंतरावर क्रॉस करताना विशेष उपाय योजना व सुरक्षितता घेण्यात आली.
७. १८०० मिमी व्यासाच्या अनिर्दिष्ट सांडपाणी वाहिन्या बोगद्याच्या कामादरम्यान सापडल्यानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समन्वयाने टप्प्याटप्याने विलगीकरण (आयसोलेशन) व नियंत्रित TBM ऑपरेशन करण्यात आले तसेच या कामदारम्यान कुठेही लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
८. बोगद्याची खोली विमानतळ स्थानकाजवळ ३० मीटर आहे पुढे बामणवाडा भूमिगत मार्गाजवळ बोगदा जमिनीवर येतो. त्या दरम्यान सहार उन्नत मार्ग तसेच विविध महत्वाचे ठिकाणी कंपन मोजणारे उपकरणे लावून TBM चे ऑपरेशन अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्यात येत आहे.
९. मेट्रो मार्ग 7अ दरम्यान टीबीएमवरील ओव्हरबर्डन प्रेशर 25 मीटर ते 1.5 मीटर पर्यंत होता. रिट्रीव्हल शाफ्टजवळ जाताना, टीबीएम ग्रेडियंट 3.5% पर्यंत वाढला, ज्यामुळे बोगद्याच्या क्राउन आणि भुयारी सेवा वाहिन्यांमध्ये अंतर फक्त 1.5 मीटर पर्यंत कमी झाले. टीबीएम फक्त 1.2 मीटर अंतरासह सबवेच्या खाली गेला. साधारणतः 6 मी क्लिअरन्सने टीबीएम बाहेर काढला जातो परंतु जागेच्या अभावी व विविध अडचणींना वर मात करून 1.2 मी ने टीबीएम बाहेर काढण्यात आली आहे.
मेट्रो 7ए प्रकल्पाची सध्याची स्थिती
मेट्रो मार्ग ७अ चे काम ५९% पूर्ण झाले आहे.
प्रकल्प टप्पे (Milestones)
१. १ सप्टेंबर, २०२३ रोजी डाउनलाइन बोगद्याचे पहिले ड्राइव्ह (TBM मशिन) सुरू केले.
२. या बोगद्याची लांबीः १.६४७ किमी असून लायनिंगसाठी ११८० रिंग्स (१.४ मीटर लांब) बसविण्यात आल्या.
बोगद्याचा व्यासः ६.३५ मीटर एवढा असून ६ भागात विशेष डिझाईन असलेल्या प्रिकास्ट रिंग्स वापरण्यात आल्या.
३. सप्टेंबर, 2023 ला TBM मशीन जमिनीपासून 30 मीटर खाली भूगर्भात उतरवण्यात आली. मेट्रो मार्ग ३ च्या वरुन, सहार उन्नत रस्त्यांच्या पायाखालून, मोठ्या सांडपाणी वाहिन्या व जल वाहिन्यांना क्रॉस करून विविध अडचणींवर मात करून दिनांक १७ एप्रिल, २०२५ रोजी TBM (जमिनीवर येणार आहे) ने बोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वीरित्या पूर्ण केला.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये या भूमिगत मेट्रो मार्गिकेला विशेष महत्तव आहे कारण या मार्गिकेमुळे मुंबईकरांना कुलाबा ते वसई-विरार मिरा-भाईंदरपर्यंत मेट्रोचा आरामदायी प्रवास अनुभवता येणार आहे. तसेच विविध मेट्रो मार्गिकेच्या जोडणीमुळे ठाणे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे. सर्व अडचणींवर मात करून मुंबई मेट्रो प्रकल्पांच्या पुढील यशस्वी वाटचालीच्या दृष्टीने हा ब्रेक थ्रू एक महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण ठरतो.
आणखी वाचा

























