Manoj Jarange Patil Mumbai Morcha : वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप करणारा 'तो' पोलीस अधिकारी मनोज जरांगेंना भेटणार, आझाद मैदानातील उपोषणाचा तिसरा दिवस
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. आज वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंवर आरोप करणारा बडतर्फ पोलीस अधिकारी जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झालाय.

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठ्यांच्या मुंबईतील तिसरा दिवस आहे. मात्र, अजूनही आंदोलकांची प्रशासनाने योग्य व्यवस्था केली नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. तर जरांगे पाटील यांची तब्येत खालावत जात असल्याने सरकारने आता यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे आज काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसताच त्यांची राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी भेट घेतली आहे. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर खळबळजनक आरोप करणारे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर दाखल झाले आहेत.
रणजीत कासले मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आझाद मैदानात दाखल झाले आहेत. कासले हे सध्या पोलीस खात्यातून बडतर्फ झाले असून, त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. आझाद मैदानात आंदोलकांसोबत उपस्थित राहून त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले रणजीत कासले?
यावेळी रणजीत कासलेंनी म्हटले आहे की, मी सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. आधी सुद्धा झालो आता सुद्धा होत असतो. जेव्हा मी मराठा समाजाबद्दल भूमिका मांडायला गेलो तेव्हा मला अनेकांनी सांगितले की, तुम्ही आंदोलनात सहभागी व्हा. त्यामुळे मी आता आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आहे. माझ्यावरच्या केसेस चालू आहेत. मला जे अधिकार दिले आहेत. त्यानुसार मीडियावर जे काय बोलायचं ते व्यक्त झालो होतो. खरंतर मी ओबीसीमधून येतो. मात्र, मराठा समाजाने मला माझ्या अडचणीच्या काळात पूर्णपणे पाठिंबा दिला आणि गाव खेड्यात मराठा समाज मोठा आहे. मी कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मला वाटलं म्हणून मी सहभागी झालो आणि पुढील तीन-चार दिवस मी या आंदोलन सहभागी असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
रणजीत कासलेंचे खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता. वाल्मिक कराड त्यांचे अंडी पिल्ली बाहेर काढणार होते. त्यामुळे ते खुनाचा आरोप सहआरोपी झाले असते, असा दावा रणजित कासले यांनी केला होता. धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याने आणि संतोष देशमुख प्रकरणात अनेक पुरावे दाबल्याने धनंजय मुंडे सहआरोपी होणार नाही, असा देखील त्यांनी म्हटले होते. तर मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर होती, असा खळबळजनक दावा देखील रणजीत कासले यांनी केला होता. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिला होती, असे देखील त्यांनी म्हटले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी रणजीत कासले राज्यभरात चांगलेच चर्चेत आले होते.
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून, गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी अन्न-पाणीही घेतलेले नाही. परिणामी, त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला आहे. शनिवारी मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे तातडीने डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. डॉक्टरांकडून मनोज जरांगेंची तपासणी करण्यात आली. जर उपोषण आणखी काही काळ सुरू राहिले, तर त्यांची प्रकृती ढासळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत काही ठोस पाऊल उचलले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
आणखी वाचा























