विक्रोळी (मुंबई) : मनसेचे विक्रोळीतील उपविभागप्रमुख विश्वजित ढोलम यांना फेरीवाल्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ढोलम यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे रुग्णालयात गेले होते.

काल विक्रोळीतील मनसेचे उपविभागप्रमुख विश्वजित ढोलम फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झाले. त्यानंतर त्यांना महात्मा फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी ढोलम यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अमित ठाकरे मध्यरात्री 2 वाजता महात्मा फुले रुग्णालयात दाखल झाले.

https://twitter.com/mnsadhikrut/status/934990830330265600

गेल्या काही महिन्यांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे मनसेच्या अंतर्गत कामांमध्ये आणि पर्यायाने राजकारण सक्रीय झाल्याचे चित्र दिसून येते आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा वारसा चालवण्यासाठी खऱ्या अर्थाने अमित ठाकरे पुढे आल्याचे बोलले जात आहे.

कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेणे, राज ठाकरेंच्या दौऱ्यांमध्ये सोबत असणे किंवा पक्षाच्या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये सहभागी होणे इत्यादी गोष्टी अमित ठाकरे करताना दिसत आहेत. त्यामुळे अमित ठाकरेंना अधिकृतरित्या राज ठाकरे कधी राजकारणात आणतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काल काय घडलं?

काल विक्रोळीत मनसेचे उपविभाग प्रमुख विश्वजित ढोलम यांना फेरीवाल्यांनी मारहाण केली. मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन देताना मारहाण झाल्याचा दावा ढोलम यांनी केला आहे. त्या माराहाणीत ढोलम चांगलेच जखमी झाले असून, त्यांच्यावर महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, यापूर्वी मुंबईतील मालाड परिसरात मनसे विभाग प्रमुखाला फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. मालाडमधील मनसेचे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांना मारहाण झाली होती.