नवी दिल्ली: पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीच्या भेटीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. दहशतवादी हाफिज सईदचा खास सहकारी आणि लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आमीर हमजाने धक्कादायक दावा केला आहे.

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने जाधव कुटुंबीयांचा अपमान करायचं हे आधीच ठरवलं होतं, असं हमजाने म्हटलं आहे.

आयएसआयने  जाधव कुटुंबीयांच्या भेटीदरम्यान प्रत्येक टप्प्यावर एक कट रचला होता. कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीचे चप्पला काढणे, कपडे बदलण्याचं कामही पाकिस्तान प्रशासनाने आयएसआयच्या इशाऱ्याने केलं, असा दावा हमजाने केला.

सौभाग्यलंकार उतरवले

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव 25 डिसेंबरला आई आणि पत्नीला भेटले. परंतु पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती.

कुलभूषण जाधव यांना काचेच्या एका बाजूला बसवलं होतं, तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती. यांच्या मध्ये असलेल्या काचेच्या भिंतीमधून पाकिस्तानचा अमानवीय चेहरा समोर आला.

कुलभूषण यांची आई-पत्नीशी बोलणं झालं पण ते ही फोनच्या माध्यमातून.

पाकिस्तान सरकारनेभेटी दरम्यान, कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र, बांगड्या आणि टिकली काढायला लावली होती. तसंच त्यांना आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत बोलण्यास मज्जाव करण्यात आला होता.

संसदेत निषेध

पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीचे सौभाग्यलंकार उतरवल्याचा निषेध, भारताच्या संसदेत करण्यात आला होता.

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबाला मानवता आणि सद्भावनेच्या आधारे भेटीची परवानगी दिल्याचे सांगणाऱ्या पाकिस्तानने मानवताही दाखवली नाही आणि सद्भावनाही, असं म्हणत भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निशाणा साधला होता.

 पाकिस्तानी मीडियानेही लायकी दाखवली

कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीदरम्यान पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी माध्यमांनी लायकी दाखवून दिली.

भेटीनंतर पाकिस्तानी माध्यमांनी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला अपमानास्पद प्रश्न विचारले.

आपके पतीने हजारो बेगुनाह पाकिस्तानीयों के खून से होली खेली, इसपर आप क्या कहेंगी?  अपने कातील बेटे से मिलने के बाद आपके क्या जजबात हैं?

अशा प्रकारचे प्रश्न पाकिस्तानी माध्यमांच्या प्रतिनिधींनी कुलभूषण यांच्या कुटुंबियांना विचारले.

संबंधित बातम्या

पाक मीडियाने लायकी दाखवली, कुलभूषण कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न

‘पाकिस्तान मुर्दाबाद’... कुलभूषण प्रकरणी शिवसेनेचा संसदेत एल्गार

कुलभूषण यांच्या पत्नी आणि आईला पाककडून विधवेप्रमाणे वागणूक : स्वराज