मुंबई : राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांच्या संदर्भात घेतलेल्या एका निर्णयाविरोधात अॅलोपॅथी डॉक्टरांच्या सर्व संघटना एकवटल्या आहेत. होमिओपॅथी डॉक्टर आता एक वर्षांचा कोर्स करुन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करु शकतात असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला अॅलोपॅथी डॉक्टरांनी विरोध केला असून त्याच्या विरोधात बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे. 

या आधी अॅलोपॅथी डॉक्टरांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करता येत होती. त्यांच्यासोबत आता होमिओपॅथी डॉक्टरदेखील एक वर्षांचा कोर्स करून आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी करू शकतात, असा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. 15 जुलै पासून या नोंदणीला सुरुवात होईल. मात्र यामुळे अॅलोपॅथी डॉक्टरांच्या अस्तित्वाला धोका असल्याचा आरोप केला जातोय. 

अॅलोपॅथी डॉक्टरांच्या संघटनांचा विरोध

चार-पाच वर्ष शिकून, मेहेनत करून, पैसे खर्च करून एमबीबीएस, एमडी, एमएस अशा पदव्या मिळवणाऱ्या डॉक्टरांना या एका निर्णयामुळे भविष्यात धोका निर्माण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन, मार्ड बी एम सी, सरकारी डॉक्टरांची संघटना MAGMO आणि ए एम सी अशा सर्वच संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. 

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत लवकरात लवकर निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. नाहीतर सर्वच अॅलोपॅथी डॉक्टर संघटना एकत्रित बंदची हाक देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. 

ही बातमी वाचा: