नवी मुंबई : दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर मोटारमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुणे-सांतरागाछी एक्स्प्रेसला होणारा भीषण अपघात टळला आणि एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. नेवडे फाटा परिसरात रेल्वेमार्गावरील दोन रूळांमध्ये लांब लोखंडी तुकडा आढळून आला. ही घटना सोमवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरून 02821 ही पुणे-सांतरागाछी एक्स्प्रेस सोमवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास जात होती. ही एक्स्प्रेस नेवडे फाटा परिसरात आली असता एक्स्प्रेसचे मोटरमन पाटील यांना गाडीखाली जड वस्तू अडकल्याचे आढळून आले. मोठ्याने आवाज येऊ लागल्यामुळे पाटील यांनी तातडीने गाडी थांबवली आणि गाडीखाली उतरून पाहिले असता दोन रेल्वे रुळांच्या मध्ये लांबलचक लोखंडी रुळाचा तुकडा पडल्याचे आढळून आले. इंजिनच्या पुढील बाजूस तो तुकडा अडकल्यामुळे आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व पोलीस तातडीने घटना स्थळी पोहोचले, रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे मार्गावर पडलेला लोखंडी तुकडा बाजूला केल्यानंतर एक्स्प्रेस पुन्हा मार्गस्थ झाली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जनशताब्दी एक्सप्रेसच्या मार्गावरही अशाप्रकारे लोखंडी तुकडा टाकलेला आढळून आला होता. मात्र, मोटरमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अपघात टळला होता. ही घटना अजून ताजी असतानाच पुन्हा असा प्रकार उघडकीस आल्यामुळे रेल्वे मार्गांच्या आणि त्यावरून धावणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दिवा-पनवेल मार्गावरील घटनेची रेल्वेमंत्र्यांकडून दखल
दिवा-पनवेल रेल्वे मार्गावील या घटनेची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दखल घेतली आहे. 'एबीपी माझा'च्या ट्विटरवरील बातमीला कोट करुन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले, "अशा घटना रोखण्यासाठी लक्ष ठेवून आहोत. आरपीएफ, जीआरपी यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सुरक्षा मोहिम राबवत आहोत."
https://twitter.com/sureshpprabhu/status/829018548144070656