मुंबई : बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. आरोपीला ट्रान्सिट रिमांडसाठी नेत असताना त्याचा एन्काऊंटर झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी स्वः संरक्षणासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पण हे एन्काऊंटर बोगस असून या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला जात आहे. त्याचबरोबर अक्षय शिंदेला (Akshay Shinde)  पैसे देऊन मारल्याचा आरोप त्याच्या आई-वडिलांनी केला आहे. त्याचबरोबर अक्षय शिंदेच्या वडिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) वडिलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती आलं आहे. 


अण्णा शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात, अमित शाह यांच्याकडे स्वतःचे कुटुंब आणि वकील अमित कटारनवरे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. ज्याप्रमाणे किरीट सोमय्या यांना संरक्षण दिले आहे, त्यापेक्षा जास्त संरक्षण आम्हाला द्यावे, कारण किरीट सोमय्या यांच्यापेक्षा जास्त धोका आम्हाला सत्ताधारी, माफिया आणि त्यांच्या चेले चपाट्याकडून आहे, असे पत्रात सांगून संरक्षणाची मागणी केली आहे. हे प्रकरण झाल्यानंतर आम्हाला तसेच आमच्या वकिलांना धमक्या येत आहेत, अक्षय शिंदे याचा खून राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचे देखील या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटूंबातील व्यक्तींनी हा राजकीय फायद्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकासाठी त्याला मारलं असल्याचं म्हटलं आहे. 


काय म्हटलं आहे त्यांनी पत्रात?


माझ्या व माझ्या परिवारातील सदस्यांना धमक्या येत आहेत. तसेच सदर प्रकरणातील वकील एडवोकेट अमित कटारनवरे हे आमची बाजू न्यायालयात मांडीत असल्या कारणाने त्यांच्या मुलीसोबत बलात्कार घडण्याची अपेक्षा काही लोकांनी समाज माध्यमां‌द्वारे व्यक्त केली आहे. तसेच माझे वकील एडवोकेट अमित कटारनवरे यांनी अधिवक्ता अधिनियम कलम 32 अन्वये विशेष परवानगी घेऊन नवी मुंबई येथील स्वप्निल सोनावणे ऑनर किलिंग प्रकरणात पीडित इसाम शहाजी सोनवणे यांची बाजू अनेक न्यायालयात मांडल्यानंतर त्यांच्यावर दोन वेळा 2017 रोजी प्राणघातक हल्ला झालेला असून त्याबाबत सानपाडा पोलीस ठाणे, नेरुळ पोलीस ठाणे मुंबई नवी मुंबई येथे भा. द. वी. कलम 307 व इतर कलम अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून सदरच्या गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यात तपासीक यंत्रणा अपयशी ठरल्यामुळे संबंधित आरोपी मोकाट फिरत असून नजीकच्या काळात आमचे वकील अमित कटारनवरे हे नांदेड येथील वजीराबाद पोलीस ठाण्यात अनुसूचित जमातीचे मित श्री शेषराव दत्तात्रय जेठेवाड यांच्या वतीने त्यांच्या अॅट्रॉसिटी काय‌द्याअंतर्गत गुन्हा दाखल होणेकामी वजीराबाद पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांसमक्ष सदर गुन्ह्यातील आरोपींच्या साथीदारांनी नांदेड बाहेर माझे वकील अमित कटारनवरे कसे जातात तेच आम्ही बघतो असे म्हणून जीवे ठार मारण्याची संबंधितांनी धमकी दिली असून माझे वकील अमित कटारनवरे हे अनेक गुन्ह्यातील पिढीतांची बाजू न्यायालयात मांडीत असून तसेच ते अॅट्रॉसिटी (अत्याचारास प्रतिबंध) काय‌द्यातील किमान २० गुन्ह्यात पीडित आहेत. सदर बाबतची हकीगत माझे वकील अमित कटार नवरे यांनी केंद्रीय गृह विभाग तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ह्या आधी ईमेल‌द्वारे कळविले आहे.


तरीही माझे वकील अमित कटारनवरे यांचा परिवर तसेच मी व माझा परिवाराच्या जीवितास किरीट सोमय्या यांच्या तुलनेत अधिकचा धोका सत्ताधारी, पॉलिटिकल, माफिया व त्यांच्या चेले चपाट्या कडून असल्यामुळे किरीट सोमय्याच्या तुलनेत अधिकचे संरक्षण प्रधान करावे ही माझी नम्र विनंती, असं पत्र अक्षय शिंदेच्या वडिलांनी लिहलं आहे.