Ajit Pawar In Maharashtra Speaker Assembly Session : कोरोनामुक्त होऊन आज विधानसभेत आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार फार्मात दिसले. पहिल्याच दिवशी फुल्ल बॅटिंग करताना अजित पवारांनी अनेक शाब्दिक षटकार लगावले. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करताना अजितदादा बोलत होते. यावेळी त्यांनी नार्वेकरांचं अभिनंदन केलं शिवाय सत्ताधाऱ्यांवर जोरदार टोलेबाजी केली.
अजित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा करताच पिनड्रॉप सायलेन्स होता. भाजपची काही मंडळी रडायला लागली. गिरीश महाजनांचं रडणं बंद होईना. फेटा बांधायला दिला तर डोळ्याचं पाणी पुसायला वापरायले. भाजपच्या आमदारांनी सांगावं की खरंच झालं ते कसं झालं. हे जे घडलंय त्यानं समाधान झालंय का हे सांगावं. चंद्रकांत दादा पाटील तुम्ही बेंच वाजवू नका तुम्हालाच मंत्रीपद मिळत की नाही. सभागृहात धाकधूक आहेत. शिवसेनेतून गेलेले 40 जणांपैकी किती जणांना मंत्रीपद मिळेल माहिती नाही.
मला मूळ भाजपवाल्यांचं वाईट वाटतं
अजित पवार म्हणाले की, मी जेव्हा समोरच्या बाजूला पाहतो तर मूळ भाजपवाले कमी दिसतात. आमच्याकडची लोकं जास्त दिसतात. मला मूळ भाजपवाल्यांचं वाईट वाटतं. पहिली लाईन पाहिली तरी लक्षात येईल. गणेश नाईक, उदय सामंत, बबन पाचपुते, रादाकृष्ण विखे पाटील हे पहिल्या लाईनमध्ये आहेत. आमच्याकडून गेलेले दीपक केसरकर तर आज एकदम भारी प्रवक्ते झाले आहेत, आम्ही शिकवलेलं कुठं वाया गेलं नाही हे दिसतंय, असं अजित पवार यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.
पवार म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितलं असतं की अडीच वर्ष झालीत, आता मला तिथं बसायचंय. तरी आम्ही तुम्हाला तिथं बसवलं असतं. काही प्रॉब्लेम झाला नसता. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांना कोट करत नसता आला ना प्रॉब्लेम असं विचारलं. यावरही सभागृहात हशा पिकला.
नार्वेकर ज्या पक्षात जातात त्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात
अजित पवार म्हणाले की, नार्वेकर ज्या पक्षात जातात त्या नेतृत्वाला ते आपलंसं करतात. शिवसेनेत गेल्यावर आदित्य ठाकरे यांना आपलंसं केलं. आमच्याकडे आल्यावर मला आपलंसं केलं. भाजपमध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांना आपलंसं केलं. आता एकनाथ शिंदे तुम्ही यांना आपलंसं करा नाही तर काही खरं नाही, असं अजित पवार म्हणाले. पवार म्हणाले की, नार्वेकर आमचे जावई आहेत. आतापर्यंत आम्ही जावयाचे हट्ट पुरा पुरवायचो. आता त्यांनी आमचा हट्ट पुरवला पाहिजे. जावयांनी सासरचा हट्ट पुरवला पाहिजे, असं ते म्हणाले.