मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अजित पवारांकडे असलेली खाती कुणाकडे द्यावीत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र देण्यात येण्याची शक्यता आहे. 

अजित पवारांकडे अर्थ, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क खात्यांची जबाबदारी होती. ही तीनही खाती राष्ट्रवादीच्या वाट्याची असल्याने ती आपल्याकडेच राहावीत यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. त्यामुळे ही खाती राष्ट्रवादीतील कोणत्या मंत्र्याकडे देण्यात यावीत यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

Ajit Pawar Portfolios : राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत चर्चा सुरू

अजितदादांकडे अर्थ खात्यासारखं महत्त्वाचं खातं होतं. त्यामुळे त्यांच्याकडील खाती कुणाकडे द्यावीत यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. त्यानुसार दादांकडे असलेली खाती कुणाला देण्यात यावीत त्याची नावं मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पक्षाच्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे ही खाती राहण्याची शक्यता आहे. त्याचसोबत एखाद्या आमदाराकडे ही खाती देऊन त्याला मंत्रिपदी घेता येतं का यासाठीही चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे.

अजितदादांचा वारसा कोण?

अजित पवार यांच्या जाण्यानं जशी पवार कुटुंबात एक पोकळी निर्माण झाली आहे तशी ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही झाल्याचं दिसतंय. गेली काही वर्षे राष्ट्रवादीचा कारभार अजित पवारांनी एकहाती पाहिलाय. अजित पवारांच्या निधनानंतर जसे कार्यकर्ते पोरके झाल्य़ाची भावना व्यक्त होते आहे तशीच भावना नेत्यांच्याही मनात आहे. त्यामुळे दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर, भावनांचा कल्लोळ ओसरल्यानंतर आता पक्षाचं नेतृत्व कोण करणार या प्रश्नाची चर्चा हळुहळु सुरु झाली आहे. 

सन 2023 साली दुभंगलेल्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा जोर धरत असतानाच अजित पवारांचं जाणं हे पक्षीय पातळीवरही मोठं नुकसान मानलं जात आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी आणि पक्ष पुढे नेण्यासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी पुढे यावं अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे. 

अजित पवार राज्याचे अर्थमंत्री होते, सोबतच उपमुख्यमंत्रीसुद्धा होते. त्यामुळे दादांचा राजकीय वारसा घरातल्याच एखाद्या व्यक्तीनं पुढे न्यावा असं मत आता व्यक्त होत आहे. अजित पवारांची सरकारमधली पदं फार काळ रिक्त ठेवता येणार नाहीत. सोबतच पक्षालाही लवकरात लवकर नवं नेतृत्व द्यावं लागेल. त्यामुळे आता दादांच्या दोन्ही मुलांपैकी कुणी या जबाबदारीसाठी पुढे येईल की सध्या राज्यसभेच्या खासदार असलेल्या सुनेत्रा पवार राज्यातल्या राष्ट्रवादीचं नेतृत्व करतील यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं आगामी काळातलं भवितव्य अवलंबून असेल. 

ही बातमी वाचा: