BDD करांना 500 स्क्वे. फुटांचं घर, 35 व्या मजल्यावरुन मुंबईचं दर्शन, अजितदादा म्हणाले, घर विकून बाहेर जाऊ नका, अन्यथा..!
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या रहिवाशांना चावी प्रदान केल्यानंतर घरं विकू नये असं आवाहन केलं आहे.

मुंबई : मुंबईतील वरळी येथील बीडीडीच्या चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील 556 सदनिकांचा चावी वाटप कार्यक्रम माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 500 स्के. फुटाच्या घरांच्या चाव्या प्रातिनिधिकपणे काही रहिवाशांना दिल्यानंतर अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. अजित पवार यांनी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आमच्या आई समान, वडिलांसमान व्यक्ती चाव्या घेत होते, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहायला मिळत होतं, असं अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी हे घरं तुमचं आहे,आपण कोणत्याही मोहाला बळी पडू नका, असं बीडीडी चाळीतील रहिवाशांना आवाहन केलं.
भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आजचा दिवस वरळीकरांसाठी ऐतिहासिक असा आहे. वरळीकरांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. अनेकांनी प्रयत्न केले, त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यातील घरांचं वितरण आज केलं आहे. मी 1991 पासून सार्वजनिक जीवनात काम करतोय. सरकारी कामांच्या उद्घाटनाला जातो तेव्हा त्यावेळी कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे केल हे पाहत असतो. मी बांधकामच शिक्षण घेतलं नाही परंतु मी बारकाईने पाहणी करत होतो. या कामात मला एक सुद्धा चूक सापडली नाही. मी खरं सांगतोय, असं अजित पवार म्हणाले.
आपण 1920 ची चाळ काढली,ब्रिटीशांनी बांधलेली चाळ अनेक जण तिथं राहिले. इथं कोकणातले लोक राहिले, बारामतीमधील महिला भेटली. बीडीडी चाळ म्हणझे मिनी भारत आपल्याला इथ पाहिला मिळत आहे. शासनाच्या धोरणांमुळं रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प पूर्ण होतील, झोपडपट्टी मुक्त मुंबईच्या दृष्टीनं वाटचाल होईल याबाबत तिळमात्र शंका नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं.
काम करणाऱ्यांनी नेहमी मोठी स्वप्न पाहिला हवीत. काम होणारच हा विश्वास असायला हवा. बीडीडी चाळीचा 92 एकर भाग तीन भागात असलेला. प्रत्येक इंच इंच जागेचा वापर करावा हे त्या सदनिकेत जाऊन बघा. 500 स्केवर फुट बांधकाम असलेले घर आपण देत आहोत. एका व्यक्तीनं सांगितलं की 35 व्या मजल्याववरून संपूर्ण मुंबई पहिला मिळत आहे. शेजारीच नमन बिल्डिंग आहे तिथला 2 लाख स्के फूट पेक्षा जास्त किमतीनं फ्लॅट विकला गेला.त्यापासून थोडं बाजूला आहोत, चांगले फ्लॅट मुंबईकरांना मिळालेले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या साक्षीनं सांगतो आता आम्ही धारावीच देखील काम करून दाखवणारच आहोत, असं अजित पवार म्हणाले.
बीडीडी चाळीचा खूप मोठा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ पाहिली. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांपैकी अनेकांचं वास्तव्य या चाळींमध्ये होते. चाळीतून टॉवर मध्ये गेलात तरी आपली संस्कृती तुटू देऊ नका. सगळं आयुष्य तुम्ही इथं जगलात, हे घरं तुमचं आहे,आपण कोणत्याही मोहाला बळी पडू नका. मुख्यमंत्री महोदय घराच्या चाव्या देतोय किमान 10 ते 15 वर्ष विकता येणार नाही असं काही तरी करा. आपला मुंबईकर मुंबईतच राहिला पाहिजे. कष्टकरी माणसाला जाऊ देऊ नका. मुंबई बाहेर जाऊ नका. प्रत्येक गोष्ट चांगली वापरली आहे. या चाळीत घरासोबत चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत, तुमच्या कष्टाचा ठेवा काही झालं तरी विकू नका, ही विनंती आहे. मला एकच सांगायचं आहे, जॅगवॉरचा नळाचा कॉक वापरला आहे. छोटे छोटे नट देखील चांगले वापरले आहेत, हे शंभर वर्ष टिकेल, असं सांगितलं. बाकीच्या चाळी खाली करुन दिल्यास चार वर्षात घरं देण्याची जबाबदारी आमची, अस टॉवर बांधणाऱ्यांनी सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.






















