Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान काल (गुरुवारी, ता,13) दुपारच्या सुमारास कोसळले. त्यात 12 क्रू मेंबर्ससह 242 लोक होते. या अपघातातून (Ahmedabad Plane Crash) फक्त एक प्रवासी वाचला. मृतांमध्ये 169 भारतीय, 52 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एक कॅनेडियन नागरिक होता. या दुर्घटनेमध्ये एकूण 265 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये केबिन क्रू मेंबर आणि इंस्टाग्राम ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर रोशनी राजेंद्र सोनघरे हीचा देखील समावेश आहे. रोशनी सोनघरे यांच्या मृत्यूला महाराष्ट्राचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दुजोरा दिला. स्थानिक आमदार आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करत म्हटले आहे की, "अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर कु. रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. तिच्या आत्म्यास सद्गती लाभो! सोनघरे कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !".(Ahmedabad Plane Crash)

रोशनी सोनघरे ही एक ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर होती

इंस्टाग्रामवर 54 हजारांहून अधिक फॉलोअर्स असलेली रोशनी सोनघरे ही एक ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर होती. तिने एअर इंडियामध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणूनही काम केले होते, अहमदाबादमध्ये झालेल्या या विमान दुर्घटनेत तिचाही मृत्यू झाला. तिच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत डोंबिवली पूर्व येथे राहणाऱ्या रश्मी राजेंद्र सोनघरे वय 26 वर्ष हीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. 

तटकरेंची नातेवाईक क्रू मेंबर अपर्णा महाडिकचा मृत्यू, 

अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानात असलेल्या वरिष्ठ क्रू मेंबर अपर्णा महाडिकचेही निधन झाले आहे. अपर्णा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नातेवाईक होती. सुनील तटकरे यांनी स्वतः सांगितले होते की अपर्णा ही त्यांच्या धाकट्या बहिणीची सून आहे आणि तिचे कुटुंब गोरेगावमध्ये राहते.

विमानात क्रू मेंबर्ससह 242 लोक 

गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफ झाल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. विमानाचा काही भाग डीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवरही पडला, ज्यामुळे इमारतीचे बरेच नुकसान झाले.विमानात दोन पायलट आणि 10 क्रू मेंबर्ससह 242 लोक होते. या अपघातात क्रू मेंबर्ससह 241 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अहमदाबाद पोलिस आयुक्तांनी माहिती दिली आहे की, एक व्यक्ती जिवंत आहे. विमान अपघातातून वाचलेल्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.

 रोशनीचे वडील आणि भाऊ अहमदाबादला रवाना

अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत डोंबिवली पूर्व येथे राहणारी रोशनी राजेंद्र सोनघरे वय 26 वर्ष हिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.ती एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती. तिच्या परिवारात तिच्यासह चार सदस्य आहेत. 1 वडील -राजेंद्र धोंडू सोनघरे वय 50 वर्ष 2 आई -शोभा राजेंद्र सोनघरे वय 45 वर्ष 3 भाऊ -विघ्नेश राजेंद्र सोनघरे वय 23 वर्ष

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डोंबिवलीतील रोशनीचे वडील आणि भाऊ अहमदाबादला रवाना झाले. स्थानिक आमदार राजेश मोरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई-वडिल आणि भाऊ सोबत राहत होती. तिचे वडील राजेंद्र आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते. मुंबई ग्रँड रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं. रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खाजगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई-वडील हे घरीच असतात. रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे व त्यांचे पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले. रोशनीनला लहानपणा पासूनच एअर होस्टेस बनायचं होतं. तिने जिद्द आणि मेहनत करत तिचे स्वप्न पूर्ण केलं. काल आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली व अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती. मात्र, याच विमानाचा अपघात झाला व रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या तिच्या घराजवळ तिच्या नातेवाईक आणि डोंबिवलीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून  कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे हे देखील तिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांना धीर दिला. तिचा भाऊ आणि तिचे वडील हे अहमदाबादला निघाले असून तिची आई दुःखात आहे.