Aaditya Thackeray on MMRDA: मातोश्री परिसरात ड्रोन फिरताना दिसल्यानंतर शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिताना गोपनीयतेचा आणि सुरक्षेचा मुद्दा जोरदारपणे मांडला. “कोणता सर्व्हे एखाद्याच्या घरात डोकावण्याची आणि दिसताच लगेच पळून जाण्याची परवानगी देतो?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आमच्याच घराचा सर्व्हे केला का संपूर्ण बीकेसीचा?
या घटनेनंतर माध्यमांनी विचारणा केली असता, एमएमआरडीएने (MMRDA) हा ड्रोन बीकेसी परिसरातील सर्व्हेसाठी असल्याचे सांगितले आणि मुंबई पोलिसांची परवानगी असल्याचा दावा केला. मात्र, ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण फेटाळून लावत विचारलं की, “जर पोलिसांची परवानगी होती, तर रहिवाशांना आधी का कळवले नाही? एमएमआरडीएने केवळ आमच्याच घराचा सर्व्हे केला का संपूर्ण बीकेसीचा?”
ड्रोन उडवण्यापेक्षा आपल्या जमिनीवरील कामाकडे लक्ष द्यावं
ठाकरे यांनी एमएमआरडीएवर भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामाचा आरोप करत तीव्र टीका केली. “एमएमआरडीएने ड्रोन उडवण्यापेक्षा आपल्या जमिनीवरील कामाकडे लक्ष द्यावं. अटल सेतू (MTHL) हे त्यांच्या भ्रष्टाचाराचं जिवंत उदाहरण आहे,” असा टोला त्यांनी लगावला. या घटनेनंतर अधिकृत सर्व्हेक्षणांच्या पारदर्शकतेवर आणि नागरिकांच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एमएमआरडीए आणि मुंबई पोलिसांकडून फक्त “हा अधिकृत सर्व्हे होता” एवढंच सांगितलं गेलं असून, यापलीकडे कोणतेही तपशील देण्यात आलेले नाहीत. मातोश्री परिसरातील या ड्रोन प्रकरणाने राजकीय वाद पेटला आहे. ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे सत्ताधारी यंत्रणांच्या भूमिकेवर आणि सर्व्हे प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर नवे प्रश्न उभे राहिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या