मुंबई  : मुंबई महापालिकेची लूट या सरकारकडून केली जात आहे. या सरकारने काढलेल्या रस्त्याच्या टेंडला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हे टेंडर रद्द करावं लागलं. त्यानंतर आता नवं टेंडर काढण्यात आलंय. 400 किलोमीटरच्या रस्त्यांसाठी 6080 कोटी रूपयांचं हे टेंडर काढण्यात आलंय. या टेंडमधून कंत्राटदारांना 48 टक्के फायदा करून देण्यात आलाय. त्यामुळेच मुंबईतील सिमेंट-कॉंक्रिटच्या रस्ते कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलाय. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत  होते.  


"मुंबईतील कामं करण्याचा कालावधी हा 1 ऑक्टोबर ते 31 मे असा असतो. कारण उर्वरित काळात पाऊस असतो. पावसाळ्यानंतर सुरू झालेली कामं पावसाळ्याआधी पूर्ण होतात. परंतु, आता हाती घेतलेली कामं पावसाळ्याआधी पूर्ण होतील का याचा यांनी अभ्यास केला नाही. हे सर्व होत असताना कंत्राटदारांना 48 टक्के फायदा करून देण्यात आला. मुख्यमंत्र्यांना मुंबईतील कामे कशी करतात हेच माहिती नाही. महापालिकेत कोणतीही बॉडी आणि महापौर किंवा लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाने ही कामे मंजूर कशी केली? हा खूप मोठा प्रश्न आहे. टेंडरचा हा पैसा मुंबईकरांच्या खिशातील आहे. कामाची समज नसतानाही टेंडर काढण्यात आलं. मुंबईतील टेंडर हे इतर राज्यांतील टेंडरपेक्षा वेगळं असतं. मुंबईत सिमेंटचे रस्ते केले जात आहेत. मग गेल्या सात वर्षांपासून आताचे मुख्यमंत्री हे मंत्री होते, त्यावेळी त्यांनी ठाण्यातील रस्ते सिमेंटचे का केले नाहीत, असा प्रश्न यावेळी आदित्य टाकरे यांनी उपस्थित केला आहे.  


"गेल्या सहा महिन्यात राज्यात मोघलाई"  


दरम्यान, राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून मोघलाई आल्यासारखं वाटत असल्याची टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केलीय. "गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात मोघलाई आली आहे असं वाटतं.  गणपती मिरवणुकीत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांकडून फायरिंग करण्यात आली. आमदाराच्याच बंदुकीतून गोळी चालवण्यात आली होती. तरी देखील आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही. पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळसारखे अनेक प्रकार राज्यात झाले आहेत. परंतु, कोणावरच कारवाई झालेली नाही. गेल्या सहा महिन्यात आम्ही सतत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करत आहे. परंतु, स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके असे सध्या राज्यात सुरू आहे. याबरोबरच अनेकवेळा महापुरूषांचा अपमान दरून देखील राज्यपालांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा प्रकारांच्या मागून मुंबईला आणि महाराष्ट्राला लुटण्याचा प्रकारा केला जात आहे. नागपूरच्या एनआयटी घोटाल्याबद्दल देखील आम्ही बोललो पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.