मुंबई : अभिनेता सोनू सूदने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली. सोनू सूदने शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. निवासी इमारतीत अवैध हॉटेल सुरु केल्याच्या आरोप मुंबई महापालिकेने सोनू सूदवर केला असून हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. त्यातच सोनूने शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणामुळेच तर सोनू सूदने शरद पवार यांची भेट घेतली नाही ना अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे.


मुंबईतील जुहूमधील रहिवासी इमारतीत परवानगीशिवाय बांधकाम केल्याचा आरोप करत बीएमसीने सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली आहे. बीएमसीच्या या तक्रारीविरोधात सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. एकीकडे बीएमसीसोबत वाद सुरु असतानाच सोनूने थेट शरद पवार यांची घेतलेली भेट महत्त्वाची समजली जात आहे.



शिवसेनेची नाराजी
कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्रातील परप्रांतीय मजुरांसाठी सोनू सूद देवदूताप्रमाणे धावून आला. सोनू सूदने गरीब मजुरांची मदत करुन त्यांना आपापल्या गावात पोहोचवलं होतं. सोनूच्या या कार्याचं सर्वच स्तरातून कौतुक झालं होतं. परंतु त्यावेळी शिवसेनेने सोनूवर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी सोनूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ही नाराजी अद्यापही कायम असल्याचं दिसतं.


काय आहे प्रकरण?
सोनू सूदने जुहू येथील 'शक्ती सागर' या निवासी इमारतीत बेकायदेशीरपणे हॉटेल सुरु केल्याबद्दल महापालिकेच्या 'के पश्चिम' विभाग कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गेल्यावर्षी 24 ऑक्टोबरला महापालिकेच्या पथकाकडून तिथली पाहणीही करण्यात आली होती. त्यावेळी तिथे मंजूर झालेल्या आराखड्यानुसार जागेचा वापर करण्यात आला नसून इमारत बांधकामात अनधिकृतपणे काही बदल केल्याचा ठपका सोनू सूदवर ठेवण्यात आला. याप्रकरणी महापालिकेने सोनू सूदला नोटीसही पाठवली होती. त्यावर आता एमआरटीपी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी सोनू सूदवर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार 4 जानेवारी रोजी महापालिकेने जुहू पोलीस ठाण्यात दिली.


महानगरपालिकेच्या या नोटीसीविरोधात सोनूनं कोर्टात याचिका दाखल केली होती. आपण कोणतेही अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकाम केले नसून आपल्याकडे पालिकेची परवानगी आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून मंजुरीने बदल करण्यात आले असल्याचा दावाही सोनूने या याचिकेतून केला आहे. त्यामुळे पालिकेने बजावलेली नोटीस रद्द करण्यात यावी आणि कारवाईला स्थगिती देण्यात यावी असे आदेश देत आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करता अंतरिम दिलासा देण्यात द्यावा, अशी विनंतीही या याचिकेतून करण्यात आली आहे.


सोनू सूद 'सराईत गुन्हेगार', बीएमसीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
अभिनेता सोनू सूद हा एक 'सराईत गुन्हेगार' असल्याचा गंभीर आरोप मुंबई महापालिकेने केला आहे. निवासी इमारतीत अवैध काम केल्याचा आरोप करत बीएमसीला बजावलेल्या नोटीसला सोनूने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यालाच उत्तर देताना महापालिकेने हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा आरोप केला आहे.