Mumbai News : शिंदे गटातील आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यात आता आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगू लागला आहे. आदित्य ठाकरे हे काल (19 जुलै) मुंबईच्या पूर्व उपनगरात निष्ठा यात्रेत आले होते. भांडुपमध्ये त्यांनी बोलताना कुर्ला इमारत दुर्घटनेचा (Kurla Building Collapse) उल्लेख केला. "जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा मी मध्यरात्री त्या घटनास्थळी होतो तर तिथले एकेकाळचे जे शिवसैनिक होते, आता मला लाज वाटते त्यांची ते आमदार गुवाहाटीमध्ये मज्जा मारत होते," असे आदित्य ठाकरे म्हणाले. काही दिवसांपूर्वी कुर्ला इथली रहिवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 19 जणांना जीव गमावावा लागला होता. 


त्याला उत्तर देताना स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी पालक मंत्री आदित्य ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर आरोप केले. "संबंधित इमारत ही म्हाडाच्या जागेत आहे. याबाबत मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार केला होता. मात्र शिवसेनेच्या वचननाम्यात म्हाडाच्या जमिनीवरील पुनर्विकासचा मुद्दा असतानाही याबाबत निर्णय झाला नाही. आता शिंदे सरकार लवकरात लवकर याबाबत निर्णय घेईल. दुर्घटनेनंतर मदत केली जाते. परंतु आधीच त्यांचा पुनर्विकास झाला असता तर ही घटना घडली नसती. दुर्घटनाग्रस्तांना फक्त भेटून काही होत नाही, त्यांचे प्रश्न सुटायला हवे. मी तिथे नव्हतो परंतु माझे कार्यकर्ते मदतकार्य करत होते. आता मी आलोय तर याबाबत माझ्या बैठका सुरु आहेत. मी मुख्यमंत्र्यांना लवकरात लवकर त्यांचे पुनर्वसन व्हावं, अशी मागणी करत असल्याचे मंगेश कुडाळकर म्हणाले. त्यामुळे आता आमदारही थेट आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करु लागल्याचे समोर येत आहे.


कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू
मागील महिन्यात 28 जून रोजी मुंबईतील कुर्ल्यामध्ये नाईक म्युनिसिपल सोसायटीमध्ये एक निवासी इमारत मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. चार मजली इमारत कोसळून 19 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. मुंबई महानगरपालिकेने 2013 मध्येच नाईक नगर सहकारी सोसायटीतील सर्व इमारती जीर्ण अवस्थेत आणि राहण्यासाठी धोकादायक असल्याचे घोषित केले होते. तिथल्या रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्याचाच भाग म्हणून इमारतीचा वीज आणि पाणीपुरवठाही खंडित केला होता. परंतु त्याआधीच इमारत कोसळल्याने 19 जणांना प्राण गमवावे लागले.