मुंबई : मुंबईत खासगी अॅम्ब्युलन्स कंपन्यांकडून कोरोना रुग्णांची लूट सुरु असल्याचं एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालं. या प्रकाराची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली आहे. लोकांची लूट करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देखील महापौरांनी दिली. मुंबईतल्या मुंबईत जाण्यासाठी खासगी अॅम्ब्युलन्स कंपन्यांकडून दहा हजार रुपयांची आकारणी होत असल्याचं 'एबीपी माझा'च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आलं होतं.

याविषयी महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "कोरोना संकटात आतापर्यंत विविध घटनांमधून माणुसकीचं दर्शन घडलं होतं. पण सध्या लोकांनी आपली माणुसकी कशाप्रकारे विकली आहे हे एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनमधून दिसलं. लोकांना पैशांची गरज आहे, पण याचा अर्थ असा नाही की 10-20 किमी अंतरासाठी तुम्ही अॅम्ब्युलन्ससाठी वाटेल तेवढे पैसे घ्याल. राज्य सरकारने दर निश्चित करुनही अशा तक्रारी प्राप्त होत असतील तर त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई व्हायला हवी."

मुंबई महापालिकेने अॅम्ब्युलन्स वाढवल्या आहेत. शिवाय आणखी काही अॅम्ब्युलन्स बीएमसीकडून घेण्यात येत आहेत. त्यामुळे आपण पूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. पण या काळात ज्यांनी माणुसकी विसरुन धंदा सुरु केला आहे, ते पूर्णपणे चुकीचं आहे, असंही त्यांनी म्हटलं.

ऑपरेशन लुटारु - एबीपी माझा स्टिंग ऑपरेशन

मुंबईत एकीकडे मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत दुसरीकडे कोरोना रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणाऱ्या अनेक खाजगी अॅम्ब्युलन्सकडून मोठी लूट सुरु असल्याचं एबीपी माझाने उघड केलं. रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटीने मागील जुलै महिन्यात अॅम्ब्युलन्सने अव्वाच्या सव्वा दर लावू नये यासाठी दर निश्चिती केली होती. त्यानुसार एमएमआर रिजनमध्ये साध्या अॅम्ब्युलन्ससाठी 14 रुपये प्रतिकिमी किंवा मग 700 रुपये 24 तासांसाठी तर आयसीयू एअर कंडिशन अॅम्ब्युलन्ससाठी 24 रुपये प्रतिकिमी किंवा मग 1190 रुपये 24 तासासाठी तर कार्डिअॅक अॅम्ब्युलन्सबाबत यामध्ये फारशी स्पष्टता नव्हती.

गरजेच्या वेळी सरकारी रुग्णवाहिका मिळत नसताना खाजगी रुग्णवाहिकेतून रुग्णाला घेऊन जाण्याशिवाय नसतो, त्यातच ही लूट केली जात आहे.

अॅम्ब्युलन्सचे दर

मुलुंड ते जोगेशवरी 20 किमी अंतरखाजगी कार्डिअॅक अॅम्ब्युलन्सचे दर - साडे आठ हजारसाध्या ऑक्सिजन अॅम्ब्युलन्सचे दर - चार हजार

बीकेसी ते सायन रुग्णालय अंतर 3 किमीखाजगी कार्डिअॅक अॅम्ब्युलन्सचे दर -5 हजार साधी ऑक्सिजन अॅम्ब्युलन्सचे दर - 3 हजार

कस्तुरबा ते जोगेश्वरी अंतर 30 किमीकार्डिअॅक अम्ब्युलन्सचे दर - 8 हजार साध्या ऑक्सिजन अॅम्ब्युलन्सचे दर - साडे तीन हजार

बीकेसी ते दहिसर अंतर 60 किमीकार्डिअॅक अॅम्ब्युलन्सचे दर - 10 हजारऑक्सिजन अॅम्ब्युलन्सचे दर - 7 हजार

केईएम ते जोगेश्वरी अंतर 20 किमी कार्डिअॅक अॅम्ब्युलन्सचे दर - 7 हजारसाध्या ऑक्सिजन अॅम्ब्युलन्सचे दर - 4 हजार