मुंबई : मराठी वृत्तवाहिनी क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण आणि भारदस्त शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या 'एबीपी माझा'च्या (ABP Majha) मुख्य वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम (Dnyanada Kadam) यांना 'शरद वैद्य स्मृती पुरस्कार' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनानिमित्त (Mumbai Marathi Patrakar Sangh) आयोजित भव्य सोहळ्यात त्यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.

Continues below advertisement

दिवंगत बहुभाषिक पत्रकार आणि साहित्यिक शरद वैद्य यांच्या स्मरणार्थ 'सर्वोत्कृष्ट निवेदन आणि सूत्रसंचालनासाठी' यंदापासून एक विशेष पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. या पुरस्काराच्या पहिल्याच वर्षी मानकरी ठरण्याचा बहुमान ज्ञानदा कदम यांनी पटकावला आहे.

डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते ज्ञानदा कदम यांच्यासह इतरही ज्येष्ठ आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

Continues below advertisement

या सोहळ्यात पत्रकारितेतील अमूल्य योगदानाबद्दल खालील दिग्गजांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले:

ज्ञानदा कदम

जयंत माईणकर (माजी ब्युरो चीफ, युएनआय)

दिगंबर सावंत

संदीप पागडे

रामकृष्ण खांदारे

राजेंद्र साळसकर

"सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना भिडणारा आणि त्यांना वाचा फोडणारा तोच खरा पत्रकार असतो," अशा शब्दांत डॉ. जाधव यांनी पत्रकारितेच्या मूल्यांवर प्रकाश टाकला.

नूतनीकरण केलेल्या सभागृहाचे उद्घाटन

या कौतुक सोहळ्यासोबतच मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनातील नूतनीकरण करण्यात आलेल्या अत्याधुनिक सभागृहाचे उद्घाटनही डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमात मराठी पत्रकारितेची समृद्ध परंपरा, तिची समाजाभिमुख भूमिका आणि बदलत्या काळातील आव्हाने यावर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. ज्ञानदा कदम यांना मिळालेल्या या यशामुळे संपूर्ण माध्यम जगतातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही बातमी वाचा :