मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला बायोलॉजिकल समजतात, ते माणूस नाहीतच. त्यांनी स्वतःची तुलना महात्मा गांधींशी करू नये, अशा शब्दात अभिजीत दिपके यांनी टीका केली. भारतातील लोकशाहीला अडचणीत आणणाऱ्या ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा द्यावा, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी मागणी यावेळी दिपके यांनी केली. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा यासाठी सीजेपीने मुंबईत मोठं आंदोलन केलं. यावेळी अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
'गांधी विचार संपणार नाही'
अभिजीत दिपके म्हणाले की, "आज गांधी जयंतीच्या निमित्त आपण आपल्या अधिकारांसाठी लढतोय. यापेक्षा गांधीजींना मोठी श्रद्धांजली नाही. इंग्रजांनी जेवढं गांधीजींना त्रास दिला नसेल तेवढा त्रास हे संघाचे लोक आम्हाला दिला. त्यांना वाटत होतं की, गांधींना गोळी घालून त्यांचा विचार संपवू शकतील. पण गांधी कधी मरत नाहीत. गांधीजी हे या देशाचा आत्मा आहे. जोपर्यंत आमच्यासारखे युवक आहेत तोपर्यंत या देशात गांधीजी जिवंत राहतील. नथुराम गोडसेसारखे हजारो येतील आणि हजारो जातील. गांधीजींच्या विचाराने हा देश पुढे चालेल."
पुढे कुणी महामानव येईल आणि स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणेल. अरे ते सांगायची गरज नाही, तुम्ही माणूस नाहीत. ते म्हणतील आम्ही विश्वगुरू आहोत. पण ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी भारताला फक्त गांधीजींचा देश म्हणूनच ओळखले जाईल. गांधी नेहरू आणि आंबेडकर यांच्यापेक्षा मोठं व्हायची कुणाची लायकी नाही, असं अभिजीत दिपके म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर दिपकेंची टीका
ज्या वेळी आपल्या देशातील लोकांना मतदानाचा अधिकार माहिती नव्हता त्या वेळी नेहरू आणि आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला. जर गांधीजी या देशाचा आत्मा असतील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाचा कणा आहेत आणि पंडित नेहरू या देशाचं मन आहेत. या तिघांच्या समोर तुम्ही काहीच नाही, असं अभिजीत दिपके म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अभिजीत दिपके म्हणाले की, "मोदींना दुसरं काहीच काम येत नाही, फक्त लोकांना रांगेत उभे करतात. कोरोना काळात लसीसाठी रांगेत उभं केलं. नोटबंदीच्या काळात बँकेच्या रांगेत उभं केलं. आता मतदान नाव नोंदीसाठी रांगेत उभं केलं. स्वतःला गरीब आईचा मुला म्हणवणाऱ्या मोदींनी आम्हाला आता गरीब आईचे मुलं बनवले. मी फकीर माणूस आहे, झोळी घेऊन निघून जाईन, असं मोदी म्हणतात. पण ती झोळी ही सत्तेची आहे. "
