मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) बोगस मतदारांवरून बॉम्ब टाकल्याचं दिसून आलं. राहुल गांधींप्रमाणेच (Rahul Gandhi) त्यांनी प्रेझेंटशन देत मतदार याद्यांमधील घोटाळ्यावर प्रकाश टाकला. वरळी मतदारसंघातील (Worli Election) जवळपास 19 हजार नावं संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी नावातील साम्य, लिंग बदल, EPIC नंबर यातील घोळ निदर्शनास आणून दिलेत.

दरम्यान, आगामी निवडणुकीत केवळ प्रचार करून उपयोगाचं नाही तर मतदार याद्यांचाही अभ्यास आवश्यक असल्याचं आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं. तर मतदारयाद्या कशा वाचाव्यात याचही मार्गदर्शन त्यांनी कार्यक्रर्त्यांना केलं. वरळीमध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर 1200 मतदार कमी करण्यात आल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

आदित्य ठाकरेंनी केलेले आरोप खालीलप्रमाणे,

Aaditya Thackeray On Vote Theft : फोटोंमध्ये घोळ घातला

आतापर्यंत ईसीनेट हे एकच असे सॉफ्टवेअर आहे जे फोटोतील चूक शोधतेय. पण आपल्या याद्यांमध्ये असे फोटो वापरण्यात आले आहेत की जे व्यवस्थित दिसत नाहीत, किंवा अनेक ठिकाणी फोटोच नाहीत. त्यामुळे ते फोटो ओळखताच येत नाहीत. अमित लालबहाहुर यादव या मतदाराचा फोटोच नाही. मग त्याला कसा ओळखणार? एकट्या वरळी मतदारसंघात 22 ते 23 हजार मतदार असण्याची शक्यता आहे.

Aaditya Thackeray On Vote Chori : दक्षिण भारतीय भाषेत नावं

वरळीतील दोन मतदार असे आहेत ज्यांची नावं ही दक्षिण भारतीय भाषेत लिहिली आहेत. मग ते कसे पकडणार? आम्ही मतदार आयोगाला त्यासंबंधी विचारलं. त्यावर आयोग म्हणतंय की, सीमाभाग असेल तर काहीतरी गडबड होऊ शकते. पण मुंबईला कुठल्या दक्षिण भारतीय राज्याची सीमा लागली आहे? त्यावर निवडणूक आयोगाकडे कोणतेही उत्तर नाही.

Aaditya Thackeray PC Today : शंभरी ओलांडलेले मतदार आधीच मृत

100 वर्षांहून अधिक वय असलेले मतदार हे 113 आहेत. यातील अनेक नावे ही या आधीच मृत झालेल्यांची आहेत. अशा लोकांच्या नावेही मतदान झाल्याचं दिसून आलं. हा फक्त एरर नाही तर घोटाळा आहे.

Maharashtra Vidhansabha Election : घर नंबराचा घोळ

मतदारयादीत अनेक नावांच्या पुढे घर नंबर हा फक्त 'झो' असं दाखवण्यात आलं आहे. त्यामध्ये अनेक मतदार राहत आहेत. जर दहाहून अधिक मतदार एकाच घरात राहत असतील तर त्याची चौकशी करण्याची जबाबदारी मतदार आयोगाची आहे. पण तशी चौकशी करण्यात आली नाही. काही ठिकाणी घराच्या पत्त्यासमोर प्रश्नचिन्ह आणि स्लॅश अशी चिन्हं वापरण्यात आली आहेत. अशी 4,177 लोक आहे ज्यांचा कोणताही पत्ता नाही, असे मतदार कुठेही सापडत नाहीत.

वरळीत 234 घरं अशी दाखवण्यात आली आहेत त्यामध्ये 3,335 मतदार दाखवण्यात आले आहेत. एका घसीटाराम हलवाई नावाच्या एका दुकानाच्या पत्त्यावर अनेक मतदार दाखवण्यात आली आहेत. हे दुकान दहा वर्षांपूर्वी तोडण्यात आलं आहे. दुकानाच्या पत्त्यावर कोणत्याही मतदाराला मतदानाचा अधिकार मिळत नाही. पण अस्तित्वात नसलेल्या दुकानाच्या पत्त्यावर अनेकांनी मतदान केल्याचं समोर आलं. संपूर्ण मुंबईमध्ये लाखो मतदार अशी घुसडण्यात आली आहेत.

Aaditya Thackeray Shivsena Meeting : आता पुढे काय करायचं?

विधानसभा निवडणुकीत झालेल्या या प्रकारानंतर आता महापालिकेच्या निवडणुकीवेळी पदाधिकारी आणि शाखाप्रमुखांनी सावध राहण्याचं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं. त्यासाठी त्यांनी पाच मुद्द्यांवर लक्ष देण्यास सांगितलं.

1. डुप्लिकेट मतदारांची यादी शोधा

2. मृत मतदार कोण हे शोधा

3. फोटो नसलेले मतदार किती आहेत ते शोधा.

4. किती जणांचे पत्ते नाहीत याची माहिती घ्या

5. एकाच पत्त्यावर अनेक मतदार असलेले किती मतदार आहेत ते शोधा.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "आपण वाट पाहतोय निवडणुका कधी येतात ते. पण यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वोट चोरी. वोट चोरी म्हणजे निवडणूक चोरी. लोकसभेनंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार असं वाटत होतं. पण यांनी वोट चोरी केली आणि सरकार आणलं. मला जे कुणी भेटायचे ते यामध्ये काहीतरी गडबड झाली असल्याचं सांगायचे. मला जे कोणी भेटायचे. आता ही लढाई ड्राफ्ट रोल येईल तेव्हापासून सुरु होईल. ड्राफ्ट रोल यादीचे वाचन झालं पाहिजे."