हिमांशू रॉय यांची आत्महत्या : मुंबई : राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (आस्थापना) आणि राज्याचे माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज (11 मे) आत्महत्या केली. मुंबईतील राहत्या घरी दुपारी पावणेदोनच्या सुमारास त्यांनी तोंडात गोळी झाडून आयुष्याची अखेर केली. रॉय यांच्या आत्महत्येने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
एक बॉडीबिल्डर, सहकाऱ्यांना मोकळीक देणारा आणि त्यांची काळजी घेणारा अधिकारी म्हणून रॉय यांची ओळख होती. हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. 2013मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. तसंच, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर आरीफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान हत्या प्रकरण अशी महत्त्वाची प्रकरणं सोडवण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती.
हिमांशू रॉय यांच्या धडाकेबाज कारवायांवर एक नजर...
धडाकेबाज ऑफिसर, धडाकेबाज कारवाया
1) कसाबला फाशी
मुंबईवर हल्ला करणाऱ्या एकमेव जिवंत अतिरेकी अजमल आमीर कसाबला फासावर लटकवण्यात हिमांशू रॉय यांचा मोठा वाटा होता. तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी हिमांशू रॉय यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती. कसाबला मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून पुण्याच्या येरवडा कारागृहात घेऊन जाण्याची जबाबदारी रॉय यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडली. त्यामुळे देशाच्या सर्वात मोठ्या गुन्हेगाराला फाशीच्या तख्तावर घेऊन जाण्याचं श्रेय हे हिमांशू रॉय यांनाच जातं.
2) जे डे हत्याप्रकरण
मिड डेचे ज्येष्ठ पत्रकार जे डे यांच्या हत्येचं गूढ उकलण्याचं श्रेयही हिमांशू रॉय यांनाच जातं. कोणतेही धागेदोरे नसताना, फक्त पुसटशा सीसीटीव्हीच्या आधारे आणि अंडरवर्ल्डमधल्या खबऱ्यांच्या माध्यमातून हिमांशू रॉय यांनी या प्रकरणी थेट छोटा राजनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. आज छोटा राजनला झालेली 20 वर्षांची शिक्षा ही हिमांशू रॉय यांच्याच कष्टाचं फलित आहे.
3) आयपीएलचा स्पॉट फिक्सिंग
2013 साली झालेल्या आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणाची पाळंमुळंही हिमांशू रॉय यांनीच खणून काढली होती. राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंपासून अनेक बड्या खेळाडूंनी केलेल्या फिक्सिंगला हिमांशू रॉय यांनी चव्हाट्यावर आणलं होतं. शिवाय या प्रकरणात गुंतलेला पैसा किती मोठ्याप्रमाणात आहे, याचाही पर्दाफाश केला होता.
4) लैला खान हत्या प्रकरण
नाशिकच्या इगतपुरी घाटामध्ये घडलेलं पाकिस्तानी अभिनेत्री लैला खानच्या हत्येच्या प्रकरणातही हिमांशू रॉय यांनीच तपास केला होता. इगतपुरीतल्या फार्महाऊसवर लैला खानसह तिच्या परिवाराची सामूहिक हत्या झाली होती. पण ही हत्या कुणी केली याचाच सुगावा लागत नव्हता. या हत्या प्रकरणाचे तार थेट काश्मीरमधल्या किश्तवाडपर्यंत पोहोचले.आणि त्यानंतर या प्रकरणी लैला खानच्या पतीला अटक करण्यात आली. या केसमध्येही हिमांशू रॉय यांनी महत्त्वपूर्ण तपास केला होता.
5) पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरण
मुंबईतल्या या हायप्रोफाईल हत्याकांडामुळे अख्ख्या मुंबईत खळबळ माजली होती. वडाळ्यातल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पल्लवी पूरकायस्थ या तरुणीची फ्लॅटमध्ये घुसून हत्या करण्यात आली होती. ही केसही तडीस लावण्यात हिमांशू रॉय यांचा मोठा वाटा होता. आधी पल्लवीच्या प्रियकरावर संशय निर्माण करणाऱ्या या केसला हिमांशू रॉय यांच्या तपासामुळेच योग्य दिशा मिळाली आणि इमारतीच्या वॉचमनला अटक करण्यात आली.
6) मीनाक्षी थापा हत्या प्रकरण
जिच्या मारेकऱ्यांना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा झाली, त्या फिल्म अभिनेत्री मीनाक्षी थापाच्या हत्या प्रकरणातही हिमांशू रॉय यांनी जबरदस्त कामगिरी केली होती. मीनाक्षीच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी हिमांशू रॉय यांनी दरभंगा, बनारस, अलाहाबाद, गोरखपूर पालथं घातलं होतं. त्यांच्या याच परिश्रमामुळे मारेकरी अमित जयस्वाल आणि प्रीती सुरीन यांना जेरबंद करण्यात यश आलं होतं.
7) शक्ती मिल बलात्कार
दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर अख्ख्या देशाला हादरवणाऱ्या सोडणाऱ्या शक्तीमिल बलात्कार प्रकरणाच्या तपासातही हिमांशू रॉय यांचा कार्यतत्परपणा दिसून आला. कोणताही पुरावा नसताना, कोणतेही धागेदोरे नसताना, रॉय यांनी या प्रकरणातल्या पाच जणांना अटक झाली. तर त्यातल्या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
8) आझाद मैदान हिंसाचार
आझाद मैदानातल्या हिंसाचारामध्ये शहिदांचा अपमान करणाऱ्यांच्या मुसक्याही हिमांशू रॉय यांनीच आवळल्या होत्या. 2012 साली रझा अकादमीने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि त्यात दंगलखोरांनी अमर जवान स्मारकाची तोडफोड करुन हिंसाचार माजवला होता. इतकंच नाही तर महिला पोलिसांवरही भ्याड हल्ला करण्यात आला. हिमांशू रॉय यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून यातल्या आरोपींना अटक केली होती. शिवाय स्मारकाची तोडफोड करणाऱ्याला थेट बिहारमधून अटक झाली होती.
संबंधित बातम्या
हिमांशू रॉय घोड्यावरुन पडले तेव्हाच घात झाला!
आयपीएस हिमांशू रॉय यांची आत्महत्या
डॅशिंग हिमांशू रॉय यांचा अल्पपरिचय