पालघर : दहीहंडी उत्सवामुळे सर्वांमध्ये जोश संचारला होता. पालघरमध्ये 73 वर्षीय वृद्धाने तिसऱ्या थरावर चढून दहीहंडी फोडली. विक्रमवीर आजोबा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरले होते.

पालघरमधील वाडा शहरात शिवाजी नगर मित्र मंडळाची दहीहंडी फोडण्याचा मान यावर्षी पुन्हा एकदा 73 वर्षीय लक्ष्मण साळुंखे यांनी मिळवला. शरीराने अत्यंत काटक असलेल्या या आजोबांनी तिसऱ्या थरावर चढून पहिल्याच प्रयत्नात दहीहंडी फोडली. गेल्यावर्षीसुद्धा लक्ष्मण साळुंखेंनी तिसऱ्या थरावर चढून पहिल्याच प्रयत्नात हंडी फोडली होती.

तरुणपणी मुंबईत असताना लक्ष्मण साळुंखे हे गोविंदा पथकात सहभागी व्हायचे. सेवानिवृत्तीनंतर ते वाड्यातील शिवाजी नगरमध्ये रहायला गेले. या भागातील सर्वच सण, उत्सवात ते हिरीरीने सहभागी होत असतात.

या धाडसाचं खास कौतुक आणि सत्कार करुन लक्ष्मण साळुंखेंना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

मुंबईसह राज्यभरात दहीहंडी उत्साहात साजरी झाली. ठाण्यात मध्यरात्री मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी महिला भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.