ठाणे : व्यापारात जमविलेल्या 1000-500 च्या जुन्या नोटा वटवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पश्चिम मुंबईतील दोघा जवाहिऱ्यांचा मनसुबा गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने उधळून लावला. शनिवारी रात्री सापळा रचून केलेल्या कारवाईत या दुकलीकडून 55 लाख 5 हजारांच्या जुन्या चलनी नोटा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गुरूमितसिंग बारज आणि जयमीन गोरा अशी ताब्यात घेतलेल्या दोघा जवाहिऱ्यांची नावे आहेत. चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा बदलून नव्या नोटा घेण्यासाठी पश्चिम मुंबईतून हे दोघे व्यापारी डोंबिवलीत येणार असल्याची खबर क्राईम ब्रांचला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय खेडकर यांच्यासह राजेंद्रकुमार खिलारे, दत्ताराम भोसले, हरिश्चंद्र बंगारा, अजित राजपूत आणि नरेश जोगमार्गे या पथकाने शनिवारी रात्रीच्या सुमारास कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ सापळा लावला.

यावेळी या दोघांना बॅगांनी भरलेल्या नोटांसह रंगेहात ताब्यात घेतले. यातील गुरूमितसिंग बारज याच्याकडून 36 लाख, तर जयमीन गोरा याच्याकडून 19 लाख 50 हजारांच्या जुन्या चलनातील नोटा हस्तगत करण्यात आल्या. या दोघांच्या विरोधात स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करून चौकशीसाठी क्राईम ब्रांचने ताब्यात घेतले आहे.

याविषयी माहिती देताना ते म्हणाले, हे दोघेही सोने-जवाहिऱ्याचे व्यापारी आहेत. व्यापारात त्यांनी या नोटा जमविल्या होत्या. मात्र या नोटा चलनातून हद्दपार झाल्यामुळे त्यांना कुणीतरी 50 टक्के कापून नव्या नोटा देण्याचे अमिष दाखविले होते. या सर्व नोटा जप्त करण्यात आल्या असून त्याची माहिती दिल्यानंतर आयकर विभाग पुढील चौकशी करणार असल्याचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक नगरकर यांनी सांगितले.