(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई पोलीस दलात 518 अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त, कोरोनामुळे सेवानिवृत्तीचा सोहळा रद्द
मुंबईमध्ये 93 पोलिस स्टेशन आहेत त्यापैकी आझाद मैदान पोलीस स्टेशन हे सगळ्यात महत्वाचे पोलीस स्टेशन मानले जाते. कारण आजूबाजूला असलेल्या व्हीआयपी परिसर, महत्त्वाची सरकारी आणि खाजगी कार्यालय आणि असंख्य आंदोलनांच आझाद मैदान साक्षीदार आहे.
मुंबई : मुंबई पोलीस दलातील आज 518 अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त झाले. मात्र कुठलाही सेवानिवृत्ती सोहळा या वेळेला न करता सन्मान चिन्ह आणि प्रशस्तिपत्र या कर्मचाऱ्यांच्या घरी पोहोचवण्यात आले. त्यामुळे हा सेवानिवृत्तीचा भावनिक सोहळा करण्याच्या पार्श्वभूमीवर वर रद्द करण्यात आला.
सदरक्षणाय खलनिग्रहणाय या एका ब्रीदवाक्य वर आपलं कर्तव्य बजावणारे मुंबई पोलीस दलातील 518 कर्मचारी आज सेवा निवृत्त झाले. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणारा सेवानिवृत्ती चा सोहळा रद्द करण्यात आला. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करण्यासाठी आणि पोलिसांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलीस प्रवक्ता प्रणय अशोक यांनी सांगितले.
पोलीस दलात 38 वर्ष कर्तव्य बजावणारे पोलीस निरीक्षक सुभाष दगडखैर हेही आज निवृत्त झाले. पोलीस दलातील जादूकर म्हणून सुद्धा दगडखैर यांची ओळख आहे. दगडखैर जितके कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत तितकेच उत्तम जादूगारही आहेत. पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरीसाठी सुभाष दगडखैर यांना राष्ट्रपती पदकाने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे. यावेळी त्यांनी सुद्धा नीयमांचे पालन करून सोहळा रद्द केला त्याचं समर्थन केलं. मात्र भविष्यात विधान परिषदेमध्ये जसा शिक्षक आमदार निवडून जातो जो शिक्षकांचे प्रश्न मांडतो तसाच एखादा पोलिस दलाचा प्रश्न मांडणारा पोलीस आमदार सुद्धा निवडून जावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
मुंबईमध्ये 93 पोलिस स्टेशन आहेत त्यापैकी आझाद मैदान पोलीस स्टेशन हे सगळ्यात महत्वाचे पोलीस स्टेशन मानले जाते. कारण आजूबाजूला असलेल्या व्हीआयपी परिसर, महत्त्वाची सरकारी आणि खाजगी कार्यालय आणि असंख्य आंदोलनांच आझाद मैदान साक्षीदार आहे. वसंत वखारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत होते. त्यांच्या कारकीर्दीमध्ये आझाद मैदान येथे 2600 पेक्षाही अधिक आंदोलनं झाली आणि सर्व आंदोलन शांततेत आणि यशस्वीपणे हाताळण्यात वसंत वाखारे यांना यश आले. इतक्या मोठ्या संख्येने आंदोलने झाली पण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कधीच वसंत वाखारे यांनी निर्माण होऊ दिला नाही. यामध्ये वरिष्ठांचा मोठा सहयोग आणि मार्गदर्शन असल्याचं वाखारे यांनी सांगितलं.
सेवानिवृत्ती सोहळा हा पोलीस दलातील भावनिक सोहळा आहे. कारण या सोहळ्यामध्ये आनंद आणि दुःख या दोघांचा संमिश्र अशा भावना पाहायला मिळतात.आनंद याचा असतो की, आता पुढील आयुष्य आपल्या रक्ताच्या नात असलेल्या कुटुंबाला जास्त वेळ देता येईल आणि कामामुळे मिळालेल्या पोलीस कर्मचारी कुटुंबापासून कुठेतरी आता लांब जात असल्याचं दुःख असते.
संबंधित बातम्या :
- कोरोनामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू; दहा दिवस उपचारानंतर घरी परतल्यावर चार तासात मृत्यू
- पोलीस दलातील ‘जादूगार’ सुभाष दगडखैर निवृत्त