मुलुंडमधील ATM चा घोळ, अकाऊंटमधून लाखो रुपये गायब
एबीपी माझा वेब टीम | 18 Dec 2017 04:45 PM (IST)
मुलुंड पूर्वेच्या कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून पैसे काढलेल्या जवळपास 50 ते 60 जणांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
मुंबई: गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने देशभरात ईव्हीएम घोटाळ्याची चर्चा असताना, मुंबईतील मुलुंडमध्ये एटीएम घोटाळा समोर आला आहे. मुलुंड पूर्वेच्या कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून पैसे काढलेल्या जवळपास 50 ते 60 जणांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. एटीएममधून पैसे काढून गेल्यानंतर, एसएमएस आला. पण त्यानंतरही चार-पाच तासांनी पुन्हा अकाऊंटमधून पैसे गेल्याचं समोर आलं. हा प्रकार एक-दोघांबाबत घडला नाही, तर तब्बल 50 ते 60 जणांना याचा फटका बसला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? मंदार प्रधान यांनी रविवारी दुपारी 4 च्या सुमारास मुलुंड पूर्वेच्या कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून दोन हजार रुपये काढले. त्यानंतर त्यांना रात्री 11 वा. अकाऊंटमधून तब्बल 27 हजार रुपये कपात झाल्याचा SMS आला. तब्बल 27 हजार रुपये कपात झाल्याचा रात्री मेसेज आल्याने, प्रधान यांना धक्काच बसला. त्यांनी थेट नवघर पोलीस स्टेशनला धाव घेतली. बरं हा प्रकार एकट्या प्रधान यांच्याबाबतीतच घडला असं नाही, तर त्या एटीएममधून ज्यांनी ज्यांनी पैसे काढले, त्यांच्या त्यांच्या अकाऊंटमधून रात्री 11 वा. पैसे कट झाले. प्रधान यांच्या एका मित्राचे तर त्यांच्या खात्यातून तब्बल 2 लाख रुपये डेबिट झाल्याचा SMS त्यांना आला. पैसे कट झालेल्या जवळपास 50 ते 60 जणांनी सध्या नवघर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असून, गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ठराविक ATM मधून पैसे काढलेल्यांचेच पैसे कट झाल्याने, हे ATM कोणी हॅक केलं आहे की काय असा प्रश्न आहे. शिवाय हा ऑनलाईन फ्रॉड आहे का, असाही प्रश्न आहे.