कॉमर्स शाखेचा पेपर फुटल्याचा प्रकार नवी मुंबईत समोर आला आहे. यापूर्वी भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकाही वेळेपूर्वीच व्हॉट्सअॅपवर उपलब्ध झाल्याची चर्चा आहे. 28 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरु झाली. त्यानंतर रोजच प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चा सुरु आहेत, मात्र राज्य मंडळाकडून याकडे डोळेझाक होत असल्याचं चित्र आहे.
सकाळी 11 वाजता परीक्षा सुरु होते. गेली दोन वर्षे परीक्षा सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्या जातात. त्यानुसार 10 वाजून 50 मिनिटांनी विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका पडणं अपेक्षित आहे, मात्र मुंबई विभागात साधारण पावणे अकराच्या सुमारासच प्रश्नपत्रिकेचा फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचं समोर आलं.
व्हॉट्सअॅपवरील प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र आणि मूळ प्रश्नपत्रिका तंतोतंत जुळत असल्याचे लक्षात आल्यावर विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.